‘चंद्राच्या त्या जागेला पंडित नेहरू आणि विक्रम साराभाईंचे नाव दिले पाहिजे होते’ – संजय राऊत

मुंबई – “चांद्रयान-3′ मोहिमेत विक्रम लॅंडरने चंद्राच्या पृष्ठभागाला सर्वप्रथम जेथे स्पर्श केला, त्या जागेचे नामकरण “शिवशक्ती पॉइंट’ असे करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूत इस्त्रो शास्त्रज्ञांची भेट घेतली तेव्हाच ही घोषणा केली. मात्र, या नामकरणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. विज्ञानावर कोणत्याही धर्माचे आक्रमण योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
राऊत म्हणाले, नामकरणाशिवाय भाजप अजून काय करू शकतो. “शिवशक्ती पॉइंट’ या नावाला आमचा विरोध नाही. मात्र, भाजप प्रत्येक गोष्टीत हिंदूत्व घेऊन येतो. काही गोष्टी या विज्ञानाशीही संबंधित असतात, हे भाजपने जरा लक्षात घ्यायला पाहीजे. भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्रावर यशस्वी लॅंडिंग केले हे भारताच्या वैज्ञानिकांचे यश आहे.
चांद्रयानने जेथे तिरंगा फडकवला आहे, त्या जागेला खरे तर विक्रम साराभाईंचे नाव दिले पाहिजे होते. तसेच त्यांना भारतरत्नही दिला गेला पाहिजे. पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई या दोन महान लोकांनी केलेल्या कामामुळेच चांद्रयान चंद्रावर गेले. पण तुम्ही शास्त्रज्ञांना विसरून जाता आणि प्रत्येक ठिकाणी हिंदुत्व घेऊन येता.
आम्ही देखील हिंदुत्वाचे पाईक आहोत, पण काही गोष्टी विज्ञानाशी संबंधीत असतात. हे वीर सावरकरांचे म्हणणे आहे. विज्ञानावर कुठल्याही धर्माचे आक्रमण ठिक नाही, असेही त्यांनी फार पूर्वीच सांगूण ठेवले आहे, असा टोलाही त्यांनी लगाविला.
नितीन देसाईंना दिलासा का नाही?
आत्महत्येपूर्वी थकीत कर्जाच्या बाबतीत काही मदत मिळावी म्हणून कलादिग्दर्शक नितीन देसाई दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटले होते. मात्र, त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. दुसरीकडे, याच भाजप नेत्यांनी पक्षाचे स्टार प्रचारक असलेल्या सनी देओलला बॅंकेने नोटीस पाठवल्यानंतर एका दिवसात दिलासा दिला.
सनी देओलला भाजपने मदत केली, त्यामुळे बॅंकेने नोटीस मागे घेतली याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही. पण, जो न्याय सनी देओलला दिला, तोच न्याय मराठी कलादिग्दर्शक असलेल्या नितीन देसाईंना का दिला नाही? असा सवाल त्यांनी यावेळी भाजपला केला.





