CM फडणवीसांसोबत ‘ती’ भेट अन् पक्षांतराची चर्चा; अखेर आता थेट पक्षप्रवेश! कोण आहेत सुधाकर बडगुजर?

Sudhakar Badgujar : राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या नावाची जोरदार चर्चा केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर असतानाच सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
त्यानंतर बडगुजर यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर ते आज आपल्या समर्थक नगरसेवकांसह भाजपात जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात सुधाकरबडगुजर नेमके आहेत तरी कोण असा सवाल विचारला जात आहे.
…त्यानंतर शिवसेनेसोबत जवळीक वाढत गेली
सुधाकर बडगुजर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दला २००७ पासून सुरूवात केली. नाशिक महापालिकेत पहिल्यांदा ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर विराजमान झाले. या अपक्षांमध्ये सुधाकर बडगुजर हे देखील होते. त्यानंतर त्यांची शिवसेनेसोबत जवळीक वाढत गेली.
२००८ मध्ये एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी शिवेसनेत पक्ष प्रवेश केला. बडगुजर यांच्या आक्रमक शैलीमुळे पक्षाने त्यांच्याकडे 2009 ते 2012 अशी तीन वर्ष नाशिक महापालिकेचे सभागृहनेते पद सोपवले होते.
२०१४ मध्ये बडगुजर यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी पक्षाकडून मिळाली. मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यानांतर २०१९ मध्ये पुन्हा त्यांना संधी देण्यात आली. पुन्हा एकदा त्यांच्या वाटेला पराभव आला. यंदाच्या निवडणुकीत देखील सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला.
त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर नाशिक जिल्हाप्रमुख पदाची सुत्रे सोपवली. आता त्यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बडगुजर यांच्यावर काही वादग्रस्त प्रकरणे देखील आहेत. ज्यामुळे ते अनेकदा चर्चेत आले होते.
स्थानिकांचा विरोध तरीही…
बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मोठा विरोध दर्शवला होता. पण तरीही स्थानिक नेत्यांच्या विरोधाला झुगारून बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
बडगुजरांना सलीम कुत्ता प्रकरण भोवलं होतं
- जिल्हाध्यक्ष असताना सुधाकर बडगुजरांची सलीम कुत्तासोबत पार्टी
- बडगुजरांच्या नातलगाच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्तासोबत पार्टी
- भाजप आ.नितेश राणे, मंत्री दादा भुसेंकडून चौकशीची मागणी
- नाशिक गुन्हे शाखेकडून बडगुजर-कुत्ताच्या पार्टीची चौकशी
- बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधात्मक कायद्यानुसार आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
- बडगुजरांना काही भेट वस्तू दिल्या गेल्याचं चौकशीत निष्पन्न
- दहशतवाद्यासोबत पार्टी केल्यानं बडगुजरांविरुद्ध एसीबीकडून गुन्हा





