Thackeray Brand : ठाकरे ब्रँडचा बँड वाजला.! ‘बेस्ट’ निकालानंतर शिंदेंची खोचक प्रतिक्रिया

मुंबई: बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संयुक्त पॅनेलला मोठा पराभव पत्करावा लागला. 21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल ठाकरे बंधूंना (Thackeray Brand) मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर तिखट टीका करत जनतेने त्यांना नाकारल्याचा दावा केला.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली येथील तीन माजी नगरसेविकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा गड अधिक मजबूत होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी बेस्ट पतपेढीच्या निकालावर भाष्य केले आणि ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
… तरीही ठाकरे बंधूंचा पराभव
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेषतः ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली, ज्यामुळे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना उत्तर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पूर्णपणे पराभव झाला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “बेस्ट पतपेढीची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली, आता काय म्हणणार? तरीही त्यांचा पराभव झाला. जेव्हा ते लोकसभा जिंकतात, तेव्हा ईव्हीएमला दोष नसतो, पण पराभव झाला की ईव्हीएम आणि निवडणूक आयोग दोषी ठरतात. जनतेने पुन्हा एकदा त्यांना नाकारले. घरी बसणाऱ्यांना जनता स्वीकारत नाही. ब्रँडचा बँड वाजवण्याचे काम जनता करते.”
जनतेने ‘खोडा’ घालणाऱ्यांना ‘जोडा’ दाखवला
शिंदे यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचा दाखला देताना सांगितले की, त्यांनी मुख्यमंत्री असताना लोकाभिमुख निर्णय घेतले. “लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, ज्येष्ठांसाठीच्या योजना आम्ही सुरू केल्या. महायुतीची दुसरी इनिंग आता सुरू आहे. आम्ही एकजुटीने लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काम करत आहोत,” असे शिंदे म्हणाले. त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 232 जागांच्या विजयाचा उल्लेख करत जनतेने त्यांच्या कामाला पोचपावती दिल्याचा दावा केला. “त्यांनी आमच्या योजनांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण लाडक्या बहिणींनी त्यांना जोडा दाखवला. जनता कामाची पावती देते,” असे शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा गड भक्कम
कल्याण-डोंबिवलीतील तीन माजी नगरसेविकांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी यानिमित्ताने स्थानिक राजकारणात आपली पकड अधिक मजबूत होत असल्याचे संकेत दिले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश आणि बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील विजय यामुळे शिंदे गटाला बळ मिळाले आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल आणि शिंदे यांच्या प्रतिक्रियेमुळे मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंना हा पराभव पचवणे कठीण जाईल, तर शिंदे गटाने या विजयाचा पुरेपूर राजकीय फायदा घेण्याची तयारी सुरू केली आहे.





