“आम्हाला वाटलं की आता काही खरं नाही”, मुंबईत मोनोरेलमध्ये अडकलेल्या 200 प्रवाशांची ‘अशी’ केली सुटका

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला असतानाच चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान धावणाऱ्या मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे जीवघेणी घटना घडली. मोनोरेल अचानक जागीच थांबली, आणि सुमारे २०० प्रवाशांचा जीव सव्वा ते दीड तास टांगणीला लागला. अखेर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
एसी, लाईट बंद; प्रवाशांचा गुदमरून त्रास –
मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती जागीच थांबली. ही मोनोरेल वातानुकूलित असल्याने दरवाजे बंद होते. बिघाडानंतर प्रथम एसी बंद पडला, त्यामुळे प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास सुरू झाला. व्हेंटिलेशन सिस्टिमही बंद पडल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. काही वेळातच आतील लाईट बंद पडल्याने अंधार पसरला, आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. मोनोरेल एका बाजूला किंचित कलल्याने प्रवाशांची घबराट अधिकच वाढली.
प्रवाशांनी हात जोडले, एकाने फोडली काच –
सव्वा तासाहून अधिक काळ प्रवासी मोनोरेलमध्ये अडकून होते. भीतीने घाबरलेल्या काही प्रवाशांनी हात जोडून सुटकेसाठी विनवणी केली. एका प्रवाशाने गुदमरल्यामुळे काच फोडली, ज्यामुळे बाहेरची हवा आत आली आणि काही प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. बचाव कार्य सुरू होण्यापूर्वी प्रवाशांनीच काचेवर हात मारण्यास सुरुवात केली होती, पण बचाव पथकाने काचेजवळ थांबू नये असं आवाहन केलं.
बचाव पथकाचं तत्पर कार्य
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने बचाव कार्य हाती घेतलं. दोन ठिकाणच्या काचा फोडून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. नोरेलमधील सर्व २०० प्रवाशांना कोणतीही दुखापत न होता सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. यावेळी महानगरपालिकेचं वैद्यकीय पथक आणि जवळील रुग्णालय सज्ज ठेवण्यात आलं होतं.
प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
“आम्हाला वाटलं की आता काही खरं नाही. अंधार, गुदमरट हवा आणि मोनोरेलची ती कललेली अवस्था पाहून जीव घाबरला,” असं एका प्रवाशाने सांगितलं. या घटनेने मोनोरेलच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, यापुढे अशा घटना टाळण्यासाठी तांत्रिक सुधारणांची गरज व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिकेने या घटनेची गंभीर दखल घेत तांत्रिक बिघाडाच्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुढील काळात योग्य उपाययोजना करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.





