Alandi News | ऑडिओ क्लिपद्वारे ज्ञानेश्वरीचा विचार जगभर पोहोचवा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रभात वृत्तसेवा
आळंदी – मंदिराच्या महाद्वारातून भक्त माऊलीचा गजर करीत पुढे जातात. ही वारकरी परंपरा फार मोठी आहे आणि ती पुढे नेत असताना समाधी मंदिरावर सुवर्ण कलश चढविला जाणे ही महत्वची घटना आहे. भाविकांच्या योगदानामुळे या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य सर्वांनाच मिळाले. वारकर्यांसाठी ज्ञानोबा हा श्वास आणि आळंदी ही काशी आहे, अलंकापुरी म्हणून परिचित असलेली आळंदी मराठीसाठी आणि भागवत धर्मासाठी महत्वाचे स्थान आहे.
आज नव्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भागवत धर्मातील विचार प्रसाराची ही परंपरा पुढे नेण्यासाठी ज्ञानेश्वरी ऑडिओ बुकचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या दोन ते तीन मिनिटांच्या ऑडिओ क्लिप तयार करून पुढच्या पिढीपर्यंत हा विचार अधिक प्रभाविपणे पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिंदे म्हणाले, देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. वारकरी संप्रदाय समाजाला सन्मार्ग दाखविणारी मोठी शक्ती आहे. त्यामुळे आपली संस्कृती कोणीही नष्ट करू शकला नाही. संत महात्मे अशावेळी सुविचार समाजात रुजवीत होते. संत ज्ञानेश्वरांनी कर्म, ज्ञान, सदाचार, नीती, भक्तीची शिकवण दिली, त्यातून समाजाला विशालदृष्टी मिळाली.
शेकडो वर्षानंतर आजही माऊली अखंड आणि पवित्र अग्निहोत्राप्रमाणे जगाला उर्जा आणि प्रेरणा देत आहेत. त्यामुळे या महाद्वारातून प्रवेश करतांना मीपण, अहंकार गळून पडेल सात्विकतेचा अनुभव भक्तांना मिळेल, असे त्यांनी सांगितले. आळंदी विकास आराखड्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.योगी निरंजननाथ यांनी प्रास्ताविकात सोहळ्याची माहिती दिली. श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात सौर ऊर्जेचा उपयोग सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.
कलशारोहण पूर्वसंध्येला भव्य मिरवणूक..
कलशारोहणाच्या पूर्वसंध्येला कलश दर्शन रथ यात्रा काढण्यात आली. यावेळी सोन्याचा कळस रथात ठेवून त्याची नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा शेकडोंच्या संख्येने नागरिक कलश दर्शानासाठी उपस्थित होते. टाळ, मृदंगाच्या आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण आळंदी नगरी दुमदुमून गेली होती. माऊली मंदिर पिरसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.





