Terrorist Attack : उधर मत जाओ.! घोड्यांनी वाचवला कोल्हापूरच्या 28 जणांचा जीव; पाहा नेमकं काय घडलं…

Terrorist Attack | Jammu Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे, या हल्ल्यामध्ये आतापर्यंत २७ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या दुःखद घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली. ते अनंतनाग याठिकाणी पोलिस नियंत्रण कक्षात पोहोचले, ज्याठिकाणी त्यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन देखील त्यांनी केले. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अमित शाह सुद्धा स्तब्ध झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, काही पर्यटक या हल्ल्यातून थोडक्यात बचावले असल्याचं दिसून आलं आहे, कोल्हापूरातून काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या 28 पर्यटकांचा जीव वाचला आहे. पहलगाममध्ये पोहोचण्यासाठी घोडे वेळत उपलब्ध झाले नाही आणि यामुळेच या पर्यटकांचा जीव वाचला आहे.
गोळीबार झालेल्या घटनेपासून अवघ्या दीड किमीवर हे पर्यटक उभे होते. या 28 जणांच्या चमूला ट्रॅव्हल्स ड्रायव्हरने उधर फायरिंग सुरू है मत जाओ” हे सांगताच हे सर्व पर्यटक माघारी फिरले. या घटनेमुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव या पर्यटकांना आला.
हा सर्व थरारक अनुभव जम्मू काश्मीर पर्यटनासाठी गेलेल्या अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आला आहे. सध्या या घटनेतील अनेक नवीन व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण असल्याचं दिसत आहे.
हल्ल्यामागे टीआरएफ आणि लष्करचे दहशतवादी :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भयानक हल्ल्याची योजना लष्कर-ए-तैयबाच्या संलग्न टीआरएफचा कमांडर सैफुल्लाहने आखली होती. रावलकोटमधील आणखी दोन लष्कर कमांडरही यात सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला करणारे एकूण ६ दहशतवादी होते.
भारताने पाकिस्तानला दिला कडक इशारा :
हल्ल्यानंतर, पाकिस्तानने नेहमीप्रमाणे या प्रकरणापासून हात झटकले आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. पण यावेळी भारतानेही कडक भूमिका घेतली आहे. सौदी अरेबियाहून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्र वापरण्यास नकार दिला.
बारामुल्लामध्ये दोन दहशतवादी ठार, सीमेवर सतर्कता :
या घटनेच्या एक दिवसानंतरच, बारामुल्लामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. हल्ल्याच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी ही कारवाई एक मोठे यश मानले जात आहे.
पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना :
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीपासून जयपूरपर्यंत सर्व पोलिस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि अभय कमांड सिस्टीमद्वारे प्रत्येक इंचावर लक्ष ठेवले जात आहे.





