S. Jaishankar – दहशतवाद हा विकासासाठी सतत एक धोका आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी सांगितले. जगाने दहशतवादी कारवायांना सहिष्णुता किंवा समर्थन दाखवू नये यावर त्यांनी भर देखील दिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या निमित्ताने जी-२० गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत जयशंकर बोलत होते. कोणत्याही आघाडीवर दहशतवादाविरुद्ध कारवाई करणारे संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाची मोठी सेवा करतात. अलिकडच्या काळात आंतरराष्ट्रीय शांतता आणि जागतिक प्रगती या दोन्हींची समांतर प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे जगाने दहशतवादी कारवायांना सहिष्णुता किंवा समर्थन दाखवू नये हे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. बहुस्तरियवादामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता कधीही नव्हती एवढी आता आहे. सद्यस्थितीत राजकीय आणि आर्थिक या दोन्ही आघाड्यांवर आंतरराष्ट्रीय स्थिती दोलायमान झाली आहे. जी-२० गटाचे सदस्य म्हणून या घटकांना स्थैर्य प्रदान करणे आणि चर्चा, मुत्सदेगिरीच्या माध्यमातून, दहशतवादाला विरोध करून आणि उर्जा आणि आर्थिक सुरक्षेसाठीची गरज ओळखून या घटकांना अधिक सकारात्मक दिशा देणे ही आपली जबाबदारी आहे, असेही जयशंकर म्हणाले. कोणत्याही संघर्षाच्या परिस्थितीत, दोन्ही बाजूंना संवाद साधण्याची क्षमता असलेले काही लोक असतील आणि अशा देशांचा वापर आंतरराष्ट्रीय समुदाय शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि शांतता कायम राखण्यासाठी करू शकतो, असेही त्यांनी सुचवले.