Pune Gramin : करडे-न्हावरे रस्त्यावर भीषण अपघात, वडिलांचा मृत्यू; मुलगा न्यायाच्या प्रतीक्षेत

निमोणे : शिरूर तालुक्यातील करडे-न्हावरे रस्त्यावर शनिवारी (दि. ८ जून २०२५) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात ५३ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धडक देणारा अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाळासाहेब रंगनाथ थोरात (वय ५३, रा. निमोणे, ता. शिरूर) असे मृत व्यक्तींचं नाव आहे. या प्रकरणी बाळासाहेब थोरात यांचा मुलगा शुभम बाळासाहेब थोरात (वय २८ रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघाताच्या दिवशी वडील बाळासाहेब थोरात हे एम एच १२ एन एन ३६०२ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन करडे गावातील चौकातुन न्हावरे रोडने घरी येत असताना समोरुन आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांच्या डोक्याला, छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.
या अपघातात बाळासाहेब थोरात यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, धडक दिलेल्या अज्ञात वाहनचालकाने मदत न करता घटनास्थळावरुन वाहन घेऊन पळ काढल्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शिरुर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार पवार हे करत आहेत. करडे येथील स्थानिक नागरिकांनी अपघाताबाबत कोणतीही माहिती असल्यास शिरुर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





