Shirur News : पुणे-नगर महामार्गावर शिरूरजवळ अपघातांचे सत्र; अवघ्या ५ दिवसांत ३ युवकांचा बळी, नागरिकांमध्ये संताप
Shirur News : पुणे-नगर महामार्गावर शिरूरजवळ अपघातांचे सत्र सुरूच आहे. ५ दिवसांत ३ तरुणांचा बळी गेल्यानंतर तोडलेले डिव्हायडर्स आणि स्पीडब्रेकर्सच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक.

Shirur News : शिरूर शहराबाहेरून जाणाऱ्या पुणे-नगर महामार्गावर गेल्या अवघ्या पाच दिवसांत तीन जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः फोडण्यात आलेले डिव्हायडर आणि त्यातून घेतले जाणारे धोकादायक ‘यू-टर्न’ स्पीडबेकर नसल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याचे चित्र आहे. (Shirur News)
शिरूर शहराबाहेरून बाबुराव नगर परीसरातून जाणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना अपुऱ्या असल्याने अपघातांचे सत्र सुरूच आहे. डिव्हायडर तोडून तयार करण्यात आलेल्या अनधिकृत मार्गांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने गंभीर अपघात घडत आहेत. (Shirur News)
ते डिव्हायडर दोन जणांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर बुजवलेले आहे. आज (दि. १६) अज्ञात कारच्या धडकेत बायपासजवळ सोमनाथ विठ्ठल बोऱ्हाडे या तरुणाचा अपघातात बळी गेला आहे. गेल्या पाच दिवसांत तीन जणांना जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अपघातानंतर काही दिवस प्रशासनाकडून पाहणी केली जाते; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. (Shirur News)
डीपी रोड आणि सर्व्हिस रोडची मागणी
शिरूर शहरातील वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी डीपी रोडचे काम तातडीने मार्गी लावावे, तसेच पुलाजवळील परिसरात आवश्यक ठिकाणी सर्व्हिस रोड व स्पीड बेकरची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यामुळे महामार्गावरील अनावश्यक वळणे, डिव्हायडरमधून होणारी वाहतूक आणि धोकादायक क्रॉसिंग कमी होण्यास मदत होईल. (Shirur News)
अपघातांची मालिका सुरू असतानाही संबंधित यंत्रणांनी केवळ अपघात घडल्यानंतर पाहणी न करता अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Shirur News)
फोडलेले डिव्हायडर बंद करणे, योग्य ठिकाणी अधिकृत यू-टर्नची व्यवस्था करणे, रस्त्यावरील प्रकाशव्यवस्था सुधारणे, दिशादर्शक फलक लावणे आणि वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. (Shirur News)
तसेच शिरूर -रामलिंग रोडवर स्पीड बेकर बसवणे गरजेचे असून कित्येक वेळा सार्वजनिक बांधकामाला सांगूनही ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा आरोप नागरिक करत आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?’ असा संतप्त सवाल शिरूरकरांकडून उपस्थित केला जात आहे. (Shirur News)





