प्रभात वृत्तसेवा भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोरील रस्ता व पुलाचे काम सणसरपर्यंत श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सध्या चालू आहे. ते काम करू दिले जाणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी एकमताने घेऊन हा रस्ता कारखान्याच्या बाजूने (बायपास) करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सणसर येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.यावेळी श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे प्रकल्प अधिकारी घोडके, ठेकेदार चव्हाण, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सणसरचे सरपंच यशवंत पाटील, माजी सरपंच पार्थ निंबाळकर, अभयसिंह निंबाळकर, ॲड. विलास खटके, शिवाजी काळे, करण निंबाळकर, किरण गायकवाड, विशाल निंबाळकर, पिंटू गुप्ते, शब्बीर काझी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत या भागातून बायपास रस्ता होत नाही. तोपर्यंत या ठिकाणी काम करू दिले जाणार नाही, असा इशारा यावेळी उपस्थित सर्वांच्या वतीने देण्यात आला.जाचक म्हणाले, इंदापूर व बारामती तालुक्यातील ५३ गावांचे क्षेत्र असलेला श्री छत्रपती कारखाना हा इंदापूर व बारामती तालुक्याच्या सीमेवर आहे. श्री छत्रपती कारखान्याचा अध्यक्ष मी असून जरी मी सणसर गावचा रहिवासी नसलो तरी साखर कारखान्याचा अध्यक्ष नात्याने ५३ गावचे पालकत्व माझ्याकडे आहे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी यावेळी घेतली. यावेळी रस्त्यालगत बंदिस्त गटार लाईन, वॉटर सप्लाय, आरोग्यासाठी सुविधा असतील ते कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेणार तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा श्री छत्रपती कारखान्यासमोरून न जाता हा रस्ता छत्रपती कारखान्याबाहेरून बायपास पद्धतीने करावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज जाचक, पालखी महामार्गाचे प्रकल्प अधिकारी घोडके, रस्त्याचे ठेकेदार चव्हाण यांची एकत्र बैठक घेऊन जो काही निर्णय होईल, त्या पद्धतीने कामाला सुरुवात करण्याची परवानगी दिली जाणार आहे. पालखी मार्गाचे जोपर्यंत बायपास पद्धतीने रस्त्याचा प्रस्ताव मंजूर होत नाही. तोपर्यंत काम करू नये अशी आक्रमक भूमिका घेतली. कारखान्या समोरील रस्ता व पुलाचे काम सणसरपर्यंत होऊ देणार नाही. जोपर्यंत या भागातून बायपास रस्ता मंजूर होत नाही. तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन याबाबतीत सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्यास देखील तयार आहेत.