Yawat : यवतमध्ये तणावपूर्ण शांतता! आठवडे बाजार शाळांना सुट्टी, जमावबंदीचे आदेश लागू

Yawat : दौंड तालुक्यातील यवत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीच्या विटंबनेनंतर यवतचे वातावरण चिघळले होते. गुरूवार (दि.३१) रात्री एका तरूणाने फेसबुक व व्हाट्सॲपवर वादग्रस्त स्टेटस ठेवले होते. याचे संतप्त पडसाद उमटले. यावेळी एका समाजाच्या मुलाला मारहाण केली.
यवत येथील इंदिरानगर भागात एका प्रार्थनास्थळाची तोडफोड व जाळपोळ करीत दुकानावर दगडफेक केली. दरम्यान, यवत परिसरात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशाने जमावबंदी लागू केली आहे.
आजही येथील आठवडे बाजार बंद असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या यवतमध्ये तणापूर्ण शांतताचे वातावरण आहे. येथे जमाबंदीचे आदेश लागू असून पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली आहे. गुरूवार (दि. ३१) रात्री फेसबुक व व्हाट्सॲप सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटसचे कारण वातावरण पुन्हा चिघळण्यास कारणीभूत ठरले.
या गंभीर घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी नागरिकांच्या एकत्रित बैठक घेतली आहे. येथील परिस्थितीवर ते लक्ष ठेवून आहेत.





