प्रभात वृत्तसेवा यवत – दौंड तालुक्यातील यवत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीच्या विटंबनेनंतर यवतचे वातावरण चिघळले होते. गुरूवार (दि.३१) रात्री एका तरूणाने फेसबुक व व्हाट्सॲपवर वादग्रस्त स्टेटस ठेवले होते. याचे संतप्त पडसाद उमटले. यावेळी एका समाजाच्या मुलाला मारहाण केली. यवत येथील इंदिरानगर भागात एका प्रार्थनास्थळाची तोडफोड व जाळपोळ करीत दुकानावर दगडफेक केली. दरम्यान, यवत परिसरात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशाने जमावबंदी लागू केली आहे. यावेळी आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. यवत येथे गावकऱ्यांनी संपूर्ण गाव बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला. यवतमधील वातावरण (दि.१) सकाळी ११ पासून पुन्हा ढवळून गेले होते. पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यवत येथे दोन दिवसांपूर्वी घटना घडली. याचे पडसाद दौंड तालुक्यात उमटले. हिंदू संघटनांनी दौंड तालुका बंदची हाक दिली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी यवत पोलिसांनी तत्काळ आरोपीस अटक केली होती. त्यानंतर काही नेत्यांची निषेध सभा झाली होती. गुरूवार (दि.३१) रात्री फेसबुक व व्हाट्सॲप सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटसचे कारण वातावरण पुन्हा चिघळण्यास कारणीभूत ठरले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी नागरिकांच्या एकत्रित बैठक घेऊन सर्व परिस्थिती आटोक्यात आणले आहे.यावेळी कोणीही कोणताही मेसेज फॉरवर्ड करू नका, समाजात तेढ निर्माण होईल. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गिल्ल यांनी केले आहे.