French Open | नदालचे विक्रमी विजेतेपद

पॅरिस – लाल मातीच्या कोर्टवरचा बादशहा स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल याने फ्रेंच ओपन टेनिस ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली. त्याने रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत नॉर्वेचा नवोदित खेळाडू कॅस्पर रुड याच्यावर सरळ तीन सेटमध्ये मात करत या स्पर्धेचे 14 वे विक्रमी विजेतेपद साकार केला. तसेच त्याने कारकीर्दीतील 22 वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपदही साकार केले.
रुडची या फेरीपर्यंतची वाटचाल आश्वासक होती, त्यामुळे हा सामना रोमहर्षक होणार अशी अपेक्षा होती मात्र, नदालने कॅस्परला कोणतीही संधी दिली नाही व सरळ 6-3, 6-3, 6-0 अशा तीनसेटमध्ये सामना जिंकला.
पहिला सेट नदालने 6-3 असा जिंकत थाटात प्रारंभ केला. दुसऱ्या सेटमध्ये कॅस्पर लढत देइल ही अपेक्षाही फोल ठरली व नदालने हा सेटही 6-3 असाच जिंकला. यानंतर तिसरा सेट सुरु झाल्यावर कॅस्परने थोडी लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याला आपल्याच सर्व्हिस राखता आल्या नाहीत.
नदालची ग्रॅंडस्लॅममधील कामगिरी
– फ्रेंच ओपन – 14
– अमेरिकन ओपन – 4
– ऑस्ट्रेलियन ओपन – 2
– विम्बल्डन – 2
पहिल्या दोन सेटमध्ये त्याने प्रत्येकी 3 गेम जिंकल्या होत्या मात्र, तिसऱ्या सेटमध्ये त्याला एकही गेम जिंकला आली नाही. हा सेट नदालने 6-0 असा जिंकत विजेतेपद साकार केले.





