“शिवरायांबद्दल वक्तव्य करून इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख?”; शरद पवार गटाच्या ‘या’ नेत्याची टीका

Jitendra Awhad On Rahul Solapurkar। राज्यात मागील काही दिवसांपासून नव्या वादाला तोंड फुटले आहे. “आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले,” असा दावा ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद उफाळून आला आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोलापूरकर यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. आव्हाडांनी सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख ? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
“हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय” Jitendra Awhad On Rahul Solapurkar ।
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये “हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय”, अशा तीक्ष्ण शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केली आहे.
हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 3, 2025
एवढेच नाही तर छत्रपती शिवरायांची उंची कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. आव्हाड त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी, “छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे”. असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे आपल्या पोस्टमध्ये आव्हाड यांनी “शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल”, असा इशाराही दिला आहे. दरम्यान राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर सोशल मीडियावर अनेक जणांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले राहुल सोलापूरकर ? Jitendra Awhad On Rahul Solapurkar ।
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये सोलापूरकर यांनी, “पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण व पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो”. असे म्हटले होते.





