pune : प्रलंबित फौजदारी दावे ६ लाखांवर

शिवाजीनगर न्यायालयातील स्थिती : दिवाणी दाव्यांची संख्या १ लाख ८७ हजार ४९२
पुणे – शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील प्रलंबित दाव्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नॅशनल ज्युडिशिअल डाटा ग्रीडच्या आकडेवारीनुसार ७ लाखअ ९० हजार दावे प्रलंबित आहेत. त्यामध्ये फौजदारी दाव्याचे प्रमाण लक्षणीय असून, त्यांची संख्या ६ लाखांवर आहे. तसेच १ लाख ८७ हजार ४९२ दिवाणी दावे प्रलंबित आहेत.
प्राथमिक सोयी-सुविधांचा अभाव, अपुरे मनुष्यबळासह अन्य समस्यांचा परिणाम हा दाव्यांच्या सुनावणीवर होत असून, प्रलंबित दाव्यांत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातच न्यायालयीन कामासाठी येणार्या पोलिसांची संख्या अपुरी असून त्याचाही परिणाम न्यायालयीन कामकाजावर होत आहे.
राज्यात ५८ लाखांवर दावे प्रलंबित
पुणे जिल्हा न्यायालयासारखीच परिस्थिती राज्यातील इतर न्यायालयांमध्येही राज्यातील प्रलंबित दाव्यांची संख्या ५८ लाखांवर आहे. नॅशनल ज्युडिशिअल डाटा ग्रीडच्या आकडेवारीनुसार राज्यात १७ लाख ६२ हजार १८१ दिवाणी तर ४१ लाख १३ हजार ८९ फौजदारी असे एकूण ५८ लाख ७५ हजार २७० दावे प्रलंबित आहेत.
प्राथमिक सोयी-सुविधांचा अभाव आणि जिल्ह्यातील अपुऱ्या न्यायाधीशांच्या संख्येमुळे प्रलंबित दावे वाढले आहेत. यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवली पाहिजे. पक्षकारांनी दाव्यात तडजोडीला प्राधान्य दिले पाहिजे.
– अॅड. हेमंत झंजाड (अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन)
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून सर्वांनी लवकरात लवकर केसेस निकाली निघण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच, किरकोळ दावे प्राधान्याने निकाली काढणे गरजेचे आहे.
-अॅड. निलेश वाघमोडे, फौजदारी वकील.





