Tenant Verification: भाडेकरूंची माहिती लपवणे पडले महागात! उरुळी कांचनमधील तीन घरमालकांवर गुन्हे दाखल
Tenant Verification: उरुळी कांचन येथील कांचन वृंदावन सोसायटीत पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी शाखेची कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ घरमालकांवर गुन्हे दाखल.

Tenant Verification- भाडेकरूंची विहित नमुन्यातील माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात सादर न केल्याप्रकरणी उरुळी कांचन येथील कांचन वृंदावन सोसायटीतील तीन घरमालकांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी शाखेने 13 ऑक्टोबर रोजी केलेल्या तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
चेतन सुभाष बहिरट (वय 40, रा. डी. पी. रोड, हडपसर), सुनीता गोपाल सिंग (वय 62, रा. सुखसागर नगर, अंबामाता मंदिराजवळ, पुणे) आणि अमोल आर. चौधरी (वय 43, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) अशी गुन्हे दाखल झालेल्या घरमालकांची नावे आहेत. बहिरट यांच्या मालकीचा ए विंगमधील फ्लॅट क्रमांक 303,
सिंग यांच्या मालकीचा बी विंगमधील फ्लॅट क्रमांक 307 आणि चौधरी यांच्या मालकीचा बी विंगमधील फ्लॅट क्रमांक 306 आहे. याप्रकरणी दहशतवादविरोधी शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन धनाजी जाधव यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. उरुळी कांचन परिसरात परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्यासंदर्भात शोधमोहीम राबविण्यात येत होती.
याच मोहिमेअंतर्गत भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देणार्या घरमालकांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कांचन वृंदावन सोसायटीतील वरील तिन्ही घरमालकांनी त्यांच्या भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात सादर केली नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पुणे जिल्हाधिकार्यांनी 28 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अन्वये जारी केलेल्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.





