Pune-Bengaluru Highway Accident: साताऱ्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक; अपघातात 2 जणांचा मृत्यू
Pune-Bengaluru Highway Accident: पाच जण गंभीर

सातारा : पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे (ता. सातारा) हद्दीत रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. कोल्हापूरहून जेजुरीकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसवे गावाच्या हद्दीत डी- मार्टसमोरील परिसरात पहाटे सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलरमधून प्रवासी जेजुरीकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर वाहन थेट महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली.
पाच जण गंभीर जखमी
धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की टेम्पो ट्रॅव्हलरच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघाताच्या वेळी वाहनातील बहुतांश प्रवासी झोपेत असल्याने त्यांना गंभीर दुखापती झाल्या. या दुर्घटनेत स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ (बापू) कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. बचावकार्यात शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे आणि अजय शिंगे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम
घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. घटनेतील मृत आणि गंभीर जखमी झालेले सर्व रहिवासी हे कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा या गावचे आहेत. या घटनेमुळे गावावरून शोककळा पसरली आहे.
या प्रकरणाची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. वाहनाचा वेग, चालकाला आलेली झोप किंवा अन्य तांत्रिक बिघाड यासह विविध बाबींची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा:





