प्रभात वृत्तसेवा चांदखेड – भर दिवसा झालेल्या मंदिर चोरीच्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. गावातील विष्णू मंदिरातून सुमारे ५० टाळ, दोन समई, मारुती मंदिरातील १० टाळ आणि गणपती मंदिरातील दोन समई असा अंदाजे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि.१०) दुपारी लंपास केला.चोरीची माहिती गावातील भजनकरी व ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर शिरगाव-परंदवडी पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लोहेकर, हवालदार गुळीक, पोलीस शिपाई डोंगरे व चितारे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली, घडलेल्या घटनेचा पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.या वेळी गावातील सरपंच नारायण गायकवाड, उपसरपंच विशाल माळी, पोलीस पाटील तेजस कांबळे, चेअरमन संजय गायकवाड, तसेच शिवाजी गायकवाड, दत्तात्रय बावकर, सचिन बावकर, वैभव गायकवाड, नवनाथ गायकवाड, योगेश गायकवाड, तेजपाल गायकवाड, अमित गायकवाड यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.