Satara Crime – चोरट्याने दानपेटीतील रोकडसह सद्गुरु परमपूज्य रमणगिरी महाराज यांच्या चांदीपत्रित सागवान लाकडी पादुका चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी पहाटे नित्यपूजेसाठी आलेल्या भाविकांना श्री केदारेश्वर मंदिर आणि श्री दत्त मंदिरातील दानपेट्या फोडलेल्या दिसल्या. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्रबुवा बर्गे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर विश्वस्त, पदाधिकारी व नागरिकांनी मंदिर परिसरात गर्दी केली.मंदिर व्यवस्थापक संभाजी कुंडलिक पडवळ (वय ५१) हे मंदिराच्या आवारातील कार्यालयात झोपले असताना त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावण्यात आल्याचे आढळले. साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती मंदिरात आल्याची माहितीही समोर आली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक, श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान पथक मंदिर परिसरातच घुटमळत राहिल्याने स्थानिक माहितीगाराचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह ? कोरेगाव शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे ४० हजारांच्या घरात असताना बुधवारी रात्री रात्रवस्तीसाठी केवळ एक महिला पोलीस अधिकारी, एक वाहनचालक, एक महिला पोलीस हवालदार व एक अंमलदार अशी चार जणांचीच नेमणूक करण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस ठाण्यातील ड्युटी बटवड्यावरून अंतर्गत धुसफुस बऱ्याच महिन्यांपासून सुरू असल्याचे बोलले जात असून त्याचा परिणाम शहराच्या सुरक्षिततेवर होत असल्याची नागरिकांची भावना आहे. तिळगंगेच्या काठी वसलेल्या श्री केदारेश्वर मंदिरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी केली. मंदिराचे कुलूप तोडून दोन दानपेट्या फोडण्यात आल्या असून सुमारे १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. महाशिवरात्रीनंतर अवघ्या चार दिवसातच चोरट्यांनी मंदिरात चोरी करून डाव साधला आहे.