Eklahare Theft : एकलहरेत चोरांचे राज्य? तीन दिवसांत दर्गा आणि मंदिर लक्ष्य; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
Eklahare Theft : एकलहरे येथील शाहमदार बाबा दर्ग्यात अज्ञात समाजकंटकांचा हैदोस; दानपेटी फोडून रोकड लांबवली, तर वीज उपकरणांची दगडाने केली तोडफोड.

Eklahare Theft – आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शाहमदार बाबा दर्ग्यातील दान पेटी तसेच बाहेरील सभामंडपातील लाईट फिटिंगचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. ही दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरीला गेली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी दर्ग्यात प्रवेश करून देवळातील आणि सभामंडपातील संपूर्ण लाईट फिटिंग दगडाने फोडून टाकली.
त्यामुळे सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच दानपेटी दगडाने फोडून यात्रेनंतर दोन महिन्यांत जमा झालेली अंदाजे चार ते पाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. माजी उपसरपंच दीपक डोके यांनी सांगितले की, या ठिकाणी अशा प्रकारची तोडफोड होण्याची ही तिसरी वेळ असून अज्ञात समाजकंटक वारंवार दर्ग्याचे नुकसान करत आहेत.
त्यामुळे प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.माजी सरपंच संतोष डोके यांनी सांगितले की, दर्गा परिसरात वारंवार होणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.याबाबत ग्रामस्थांची बैठक घेऊन लवकरच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, एकलहरे गावात तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळेजवळील कमलजादेवी मंदिरातही चोरीची घटना घडली होती.अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा कडी-कोंयडा तोडून देवीच्या गळ्यातील नकली दागिने चोरून नेले.यापूर्वीही या मंदिरातून एक तोळा सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.त्याच उद्देशाने पुन्हा चोरी केली असावी,असे मत ग्रामपंचायत कर्मचारी राहुल डोके यांनी व्यक्त केले.





