Shweta Tiwari : “राज ठाकरेंशी संबंध जोडणं हा शुद्ध मूर्खपणा..”; अभिनेत्री श्वेता तिवारीच्या आरोपांवर शालिनी ठाकरे संतापल्या, पोस्ट चर्चेत !
श्वेता तिवारीच्या या भूमिकेनंतर आता मनसेच्या पदाधिकारी शालिनी ठाकरे यांनी तिच्यावर थेट निशाणा साधला आहे. शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून श्वेताला सडेतोड उत्तर दिले आहे.

Shalini Thackeray | Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेदरम्यानचा सोशल मीडिया वाद आता आणखी चिघळला आहे. सोशल मीडियावर महिलांविरोधात वापरल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेविरोधात आवाज उठवत श्वेता तिवारीने काही ट्रोलर्सचे स्क्रीनशॉट शेअर केले होते.
यातील एका व्यक्तीचा उल्लेख तिने डॉक्टर म्हणून केला होता, तर त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून तो राज ठाकरे आणि मनसेचा समर्थक असल्याचं दिसत असल्याचा दावा तिने केला होता. यानंतर श्वेताने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच सवाल करत, ‘असे लोक तुमचे समर्थक असतील तर त्यांचं हे वर्तन तुम्हाला मान्य आहे का?’ असा प्रश्न उपस्थित केला होता.
श्वेता तिवारीच्या या भूमिकेनंतर आता मनसेच्या पदाधिकारी शालिनी ठाकरे यांनी तिच्यावर थेट निशाणा साधला आहे. शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून श्वेताला सडेतोड उत्तर देत, एखाद्या व्यक्तीचा राज ठाकरे यांच्यासोबत फोटो आहे म्हणून त्याच्या वैयक्तिक वर्तनाचा संबंध थेट राज ठाकरे किंवा मनसेशी जोडणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
शालिनी ठाकरे नेमकं काय म्हणाल्या….
शालिनी ठाकरे म्हणाल्या, ‘मी राजसाहेबांच्या पक्षाची एक पदाधिकारी आहे. आमचा पक्ष हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. स्त्रियांचा सन्मान करणे हे आमच्या संस्कारात आणि रक्तात भिनले आहे. एखाद्या विकृत माणसाने महिलेशी गैरवर्तन केले तर त्याला धडा शिकवण्याची ताकद मनसेच्या मनगटात आहे.
View this post on Instagram
राजसाहेब आणि त्यांचे पदाधिकारी, महिलांचा किती आणि कसा सन्मान करतात हे मला सांगायची गरज वाटत नाही. संपूर्ण महाराष्ट्र हे जाणून आहे. कोणत्याही महिलेला अपशब्द बोलणे हे चूकच…. पण फक्त कोणाचातरी फोटो राजसाहेबांसोबत आहे म्हणून त्याच्या वागण्याचा संबंध राजसाहेबांशी जोडणे हा शुद्ध मूर्खपणा आहे.
मी पुढे एवढंच म्हणेन की कलाकारांनी समाजात इतर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर सुद्धा आवाज उठवावा व सरकारला प्रश्न विचारावे. बलात्काराच्या आरोपींना हार तुरे घालणाऱ्यांचा निषेध करा, महाराष्ट्रातून गायब होणाऱ्या तरुण मुलींबद्दल सरकारला प्रश्न विचारा, 2014 पासून सुरू झालेल्या वाईट ऑनलाईन ट्रोलिंग बद्दल सरकारला जाब विचारा… आपल्या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळावी म्हणून मराठी माणूस, राजसाहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वापर करू नका…असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.





