Tejashwi Yadav : बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीए सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री हे भाजपच्या हातातील कठपुतळी बनले असून बिहारमध्ये गुन्हेगार निर्भयपणे फिरत आहेत, असा आरोप त्यांनी शुक्रवारी केला. विधानसभेबाहेर पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले की, राज्यात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृह आणि कायदा ही महत्त्वाची खाती असूनही, भाजपमुळे ते इतके हतबल झाले आहेत की ही खाती केवळ नावापुरतीच त्यांच्याकडे उरली आहेत. सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा दावा करत त्यांनी उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा आणि सम्राट चौधरी यांच्या नावांचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला. बिहारमध्ये गुन्हेगारांचे नग्न नृत्य सुरू आहे आणि त्यांना कोणतीही शिक्षा होत नाही. जेव्हा विरोधी पक्ष यावर प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांना धमकावले जाते, असे तेजस्वी यादव यांनी नमूद केले. बिहारसह सर्व भाजपशासित राज्यांमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.