Tejas MK 1A : तेजस विमानाची पहिली चाचणी यशस्वी

बेंगळूरु – तेजस एमके-१ ए या मालिकेतील पहिल्या विमानाची गुरुवारी बेंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या प्रांगणातून यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली, असे हिंदुस्थान एरॉनॉटिक्सने म्हटले आहे. या चाचणी उड्डाणाचा कालावधी १८ मिनिटे होता. मुख्य चाचणी पायलट ग्रुप कॅप्टन के के वेणुगोपाल (निवृत्त) हे विमान चालवत होते.
फेब्रुवारी २०२१ मध्ये करारावर स्वाक्षरी झाली त्यानंतर हिंदुस्थान एरॉनॉटिक्सने जागतिक भू-राजकीय वातावरणातील प्रमुख पुरवठा साखळी आव्हानांमध्ये रचना आणि विकासासह हा महत्त्वपूर्ण उत्पादन टप्पा गाठला आहे, असे हिंदुस्थान एरॉनॉटिक्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सी बी अनंतकृष्णन यांनी सांगितले.
त्यांनी या यशाबद्दल संरक्षण मंत्रालय, हवाई दल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओला धन्यवाद दिले आहेत. तेजस एमके १ ए हे हवाई दलासाठीचे विमान सर्व ऋतूंमध्ये चालवले जाऊ शकणारे हलक्या वजनाचे लढाऊ विमान असून ४.५ जनरेशनचे तंत्रज्ञान त्यासाठी वापरण्यात आले आहे.





