Bribery Case : ५० लाख रुपयांची लाच घेताना तहसीलदाराला अटक; १३ एकर जमिनीसाठी मागितले होते १ कोटी
Bribery Case : कर्नाटकातील लोकायुक्त पोलिसांनी रचलेल्या जाळ्यात धारवाडचे तहसीलदार सच्चिदानंद कुचनूर अडकले आहेत.

Bribery Case : लोकायुक्त पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात धारवाडचे तहसीलदार सच्चिदानंद कुचनूर अडकले. १३ एकर जमीन शेतीसाठी अयोग्य असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी कथितरित्या १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यापैकी ५० लाख रुपयांची रोकड स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी कुचनूर यांना रंगेहाथ अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Bribery Case)
लोकायुक्त पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराकडे एकूण ३३ एकर जमीन आहे. त्यातील १३ एकर जमीन शेतीसाठी योग्य नसल्याचे प्रमाणपत्र त्यांना हवे होते. या जमिनीवर निवासी बांधकाम करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यासाठी तहसीलदार कुचनूर यांनी कथितरित्या १ कोटी रुपये रोख आणि १ एकर जमीन अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (Bribery Case)
तहसीलदारांकडून लाचेची मागणी झाल्यानंतर जमीनमालकाने लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या मदतीने सापळा रचला. तक्रारदाराने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुचनूर यांना भेटण्यासाठी बोलावले. मात्र, कामात व्यस्त असल्याचे सांगत त्यांनी त्यावेळी भेटण्यास नकार दिला. (Bribery Case)
दरम्यान, तक्रारदाराची जमीन पुणे-बंगळुरू महामार्गालगत येरिकोप्पा गावात असल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरात आयआयटी धारवाड आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाची उभारणी झाल्यानंतर जमिनीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे संबंधित १३ एकर जमिनीची किंमत सुमारे १५ कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. (Bribery Case)
पूजा सोडून लाचेचे पैसे घेण्यासाठी आले?
गुरुवारी तहसीलदार कार्यालयाजवळ गणपतीची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे पाच हजार लोकांसाठी प्रसादाच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती आणि त्याची जबाबदारी कुचनूर यांच्याकडे होती. (Bribery Case)
याचदरम्यान तक्रारदाराने कुचनूर यांच्याशी संपर्क साधला. ५० लाख रुपयांची रोकड घेऊन फिरणे धोकादायक असल्याचे तक्रारदाराने सांगितल्यानंतर कुचनूर यांनी पूजा आणि कार्यक्रमाची तयारी सोडून भेटण्यासाठी येण्याचे ठरवले, अशी माहिती लोकायुक्तांच्या कारवाईनंतर समोर आली. (Bribery Case)
कुचनूर यांनी तक्रारदाराला रात्री साडेआठच्या सुमारास धारवाड येथील कर्नाटक आर्ट्स कॉलेजमध्ये येण्यास सांगितले. मात्र, तहसीलदार स्वतः रात्री साडेनऊच्या सुमारास कारमधून तेथे पोहोचले. (Bribery Case)
कुचनूर येण्यापूर्वीच लोकायुक्त पोलिसांनी परिसरात सापळा रचला होता. तक्रारदाराकडून ५० लाख रुपयांची लाच स्वीकारताच अधिकाऱ्यांनी कुचनूर यांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान त्यांनी सुटकेसाठी अधिकाऱांकडे विनवणी केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, लोकायुक्त पोलिसांनी कारवाई पूर्ण करत त्यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास लोकायुक्त पोलिसांकडून सुरू आहे. (Bribery Case)





