IND W vs WI W 1st T20I : ‘जेमिमा-तीतास’ची दमदार कामगिरी, टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय…

IND W vs WI W 1st T20I Match Result : भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला संघांमध्ये तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव केला. जेमिमाह रॉड्रिग्ज आणि तीतास साधू यांनी भारताला सामना जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
रॉड्रिग्सनं फलंदाजीमध्ये तर तीतास साधू चेंडूने गोंलदाजीत चमकदार कामगिरी केली. रॉड्रिग्स सामन्याची मानकरी ठरली. फलंदाजी करताना जेमिमाह रॉड्रिग्जने 35 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 73 धावा केल्या तर गोलंदाजीत तीतास साधूने 4 षटकात 37 धावा देत भारताकडून सर्वाधिक 3 बळी घेतले.
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 4 गडी गमावताना 195 धावा केल्या. या काळात करिश्मा रामहारिकने वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 2 बळी घेतले.
विजयासाठी 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 7 बाद 146 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. वेस्ट इंडिजकडून डिआंड्रा डॉटिननं सर्वाधिक 52 धावांची तर कियाना जोसेफने 49 धावांची खेळी केली. मात्र, त्या संघाला विजयापर्यंत नेण्यास अपयशी ठरल्या. भारताकडून तीतास साधूने 37 धावांत तीन बळी घेतले, तर दीप्ती शर्माने 21 धावांत दोन आणि राधा यादवने 28 धावांत दोन गडी बाद केले.





