वाघोली – वाघोली-बकोरी रोडची अनेक वर्षांपासूनची असलेली समस्या सोडविण्यासाठी तसेच बिल्डरांनी केलेल्या फसवणुकीबाबत वाघोली येथील बकोरी फाटा येथे आंदोलन वाघोली अगेन्स्ट करप्शन ऑर्गनायझेशन (टीम वाको) च्या वतीने शनिवारी (दि.१३) सुरु झाले आहे. टीम वाकोचे अनिलकुमार मिश्रा यांनी उपोषणास सुरुवात केली असून सोसायटीधारक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठींबा दर्शविला आहे. बकोरी रोडबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. पीएमआरडीए व बिल्डर्स यांच्या संगनमतामुळे टाऊन प्लॅनिंगमध्ये दाखवलेला ६० फूट बकोरी रोड प्रत्यक्षात कधीच उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तरीसुद्धा बिल्डर्सना परवानग्या, टाऊन प्लॅनिंग मंजुरी व भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. नागरिकांकडून कर व विकास शुल्क वसूल करूनही आज रोजी रस्ता व्यवस्थित नाही. केवळ ९ फूट अरुंद रस्त्यावर जीव धोक्यात घालून रहिवाश्यांना प्रवास करावा लागतो. यामुळे दररोज गंभीर अपघात, ट्रॅफिक व प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेकांनी रस्ता होण्याबाबत पाठपुरावा करूनही अद्याप तोडगा निघत नाही. प्रशासनही याकडे गांभीर्याने पाहत नाही