IND vs PAK सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा! पाकिस्तानी गोलंदाजाचा संयम सुटला; षटकार खाल्ल्यावर भारतीय फलंदाजावर भिरकावला चेंडू
IND vs PAK U19 : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सय्याम याने संतापाच्या भरात भारतीय फलंदाजाच्या दिशेने चेंडू भिरकावल्याने तणाव निर्माण झाला होता.

IND vs PAK U19 World Cup Mohammad Sayam Aggression : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मैदानावरचे युद्ध हे केवळ धावा आणि विकेट्सपुरते मर्यादित नसते, तर तिथे भावनांचाही मोठा उद्रेक पाहायला मिळतो. बुलावायो येथे सुरू असलेल्या अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर सिक्स सामन्यात पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सय्याम याने संतापाच्या भरात भारतीय फलंदाजाच्या दिशेने चेंडू भिरकावल्याने मैदानात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकं काय घडलं?
भारतीय डावाच्या १२ व्या षटकात ही घटना घडली. भारताचा फलंदाज वेदांत त्रिवेदीने फ्री हिटचा फायदा घेत सय्यामला डीप मिडविकेटच्या वरून एक उत्तुंग षटकार लगावला. पुढच्या चेंडूवर सय्यामने पुनरागमन केले आणि वेदांतने तो चेंडू बचावात्मक खेळून थेट गोलंदाजाकडे परत केला. कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न नसतानाही, संतापलेल्या सय्यामने चेंडू उचलला आणि तो थेट बॅटिंग एंडच्या स्टंप्सच्या दिशेने जोरात भिरकावला. हा थ्रो भारतीय फलंदाजाला लागण्याची शक्यता होती, ज्यामुळे पंचांनीही यावर नाराजी व्यक्त केली.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) February 1, 2026
टॉसवेळी ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम!
सामन्याच्या सुरुवातीलाच वातावरणातील तणाव दिसून आला. टॉससाठी मैदानावर आलेले भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे आणि पाकिस्तानचा कर्णधार फरहान युसूफ यांनी परंपरेनुसार एकमेकांशी हस्तांदोलन (Handshake) केले नाही. गेल्या काही काळापासून भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये ही ‘नो हँडशेक’ पॉलिसी सातत्याने पाहायला मिळत आहे, ज्याची चर्चा क्रीडा विश्वात रंगली आहे.
भारतीय डावाची खडतर सुरुवात –
आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी बाद
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला पाकिस्तानच्या धारदार गोलंदाजीचा सामना करावा लागला. मोहम्मद सय्यामने एकाच षटकात दोन बळी घेत भारताला बॅकफूटवर ढकलले. फॉर्मात असलेला वैभव सूर्यवंशी (३० धावा) आणि कर्णधार आयुष म्हात्रे (०) हे दोघेही बाद झाले. भारताची अवस्था एकावेळी ४७ धावांवर ३ बाद अशी झाली होती, ज्यामुळे आता मधल्या फळीवर मोठी जबाबदारी आहे.
सेमीफायनलचे समीकरण –
हा सामना सुपर सिक्समधील शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा सामना आहे. भारत तीन सामन्यांत तीन विजयांसह (+३.३३७ नेट रनरेट) मजबूत स्थितीत आहे. भारताला केवळ विजय मिळवणे पुरेसे आहे. मात्र, पाकिस्तान दोन विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानला सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला मोठ्या फरकाने हरवणे अनिवार्य आहे.





