Hong Kong Super Sixes : हाँगकाँग सुपर सिक्सेसमध्ये भारत सुपर फ्लॉप! पाकिस्तानने पटकावलं जेतेपद

Hong Kong Super Sixes 2025 : हाँगकाँग सुपर सिक्सेस २०२५ स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला अत्यंत निराशाजनक कामगिरीचा सामना करावा लागला असून, संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला आहे. स्पर्धेत केवळ एक विजय मिळवत भारतीय संघाने सुपर फ्लॉप शो दाखवला, तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने फायनल सामन्यात कुवेतचा एकतर्फी पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.
पाकविरुद्ध एकमेव विजय, त्यानंतर सलग चार पराभव –
भारतीय संघाने या स्पर्धेची सुरुवात चांगली केली होती. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या त्यांच्या पहिल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर, डकवर्थ लुईस (DLS) नियमानुसार भारताने केवळ २ धावांनी निसटता विजय मिळवला. मात्र, हाच भारताचा या स्पर्धेतील एकमेव विजय ठरला.
🏆 Champions of the Hong Kong Sixes 2025! 🌍
Pakistan rise above all to claim ultimate glory, conquering Kuwait in a final that had it all — passion, precision, and pure power!A fitting end to the world’s fastest cricket carnival — where legends were made, and history was… pic.twitter.com/F91WWUGEnD
— Hong Kong Sixes (@HongKongSixes) November 9, 2025
पहिल्या विजयानंतर भारतीय संघाला पुढील चारही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, भारताला यूएई, कुवेत, नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या तुलनेने कमी अनुभवी संघांकडूनही पराभूत व्हावे लागले. यामुळे भारतीय संघाचा या स्पर्धेतील प्रवास इथेच संपुष्टात आला.
हेही वाचा – IND vs AUS : वर्ल्ड कप 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाची कमान कोण सांभाळणार? मिचेल मार्शने दिले ‘हे’ उत्तर
शेवटच्या सामन्यातही श्रीलंकेकडून मोठा पराभव –
भारतीय संघाने रविवारी (९ नोव्हेंबर) स्पर्धेतील आपला शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला. या सामन्यातही भारताला ४८ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. महत्त्वाचे म्हणजे, कर्णधार दिनेश कार्तिकला विश्रांती देण्यात आली होती आणि त्याच्या अनुपस्थितीत स्टुअर्ट बिन्नीने संघाचे नेतृत्व केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने ६ गडी गमावून १३८ धावांचे मोठे लक्ष्य उभे केले होते. प्रत्युत्तरात १३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला निर्धारित षटकांमध्ये ३ गडी गमावून केवळ ९० धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून भरत चिप्लीने ४१ धावांची तर कर्णधार स्टुअर्ट बिन्नीने नाबाद २५ धावांची खेळी केली. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, भारतीय खेळाडू या सामन्यात श्रीलंकेसमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरले. सलग चार पराभवांमुळे भारतीय संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.





