Teacher Election Duty : शिक्षक निवडणुकीच्या कामातून मुक्त; पण ‘हे’ एक कारण अंगाशी येऊ शकतं; वाचा नवा नियम
Teacher Election Duty : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा आणि सी-टीईटी परीक्षेचा पेच सुटला; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मागवली शिक्षकांची यादी.

Teacher Election Duty – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) ८ फेब्रुवारीला सी-टीईटी परीक्षा घेत असून यासाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांना फेब्रुवारीत होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या कामकाजातुन वगळण्यात येणार आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम घोषीत झाला असून त्यानुसार मतदान ७ फेब्रुवारी व मतमोजणी ९ फेब्रुवाराला आहे.
सी-टीईटी परीक्षाही ८ फेब्रुवारीला आहे. परीक्षेस बसणाऱ्या काही शिक्षकांची नियुक्ती निवडणुकीच्या कामकाजाकरिता केली आहे. याबाबत विविध शिक्षक संघटनांनी या शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळावे अशी मागणी शासनाकडे केली होती. स्थानिक जिल्हाधिकारी यांनाही त्याबाबत निवेदने दिली होती.
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांची नोकरी करायची असल्यास व पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक केली आहे. त्यामुळे सी-टीईटी परीक्षेसाठीही बहुसंख्य शिक्षकांनी नोंदणी केलेली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातुन वगळले आहे.
शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातुन वगळण्याबाबत राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील सर्व निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडून माहिती मागविली आहे, असे शिक्षक संघटनांनी स्पष्ट केले आहे.
अन्यथा कारवाई
काही शिक्षक, कर्मचारी हे सी-टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले असुनही केवळ निवडणुकीच्या कर्तव्यातून सुट मिळावी याकरिता पुन्हा परीक्षेस बसले असुन तेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सूट मागत आहे. त्यामुळे सी-टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने मागविली आहे.
केवळ निवडणुक कर्तव्यातुन सुट मिळावी म्हणुन पुन्हा सी-टीईटी परीक्षेस बसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे.





