Khalapur News : खालापूर पंचायत समितीत मोठा ‘गेम’! महायुतीचा झेंडा फडकला, ‘या’ दोन चेहऱ्यांनी मारली बाजी
Khalapur News : ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या 'परिवर्तन आघाडी'चे आव्हान मोडीत; महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत महायुतीची शक्तीप्रदर्शनासह विजयाची गुलाल उधळण.

Khalapur News – ११ मार्च रोजी सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक झाली. महायुतीकडून सभापती पदासाठी कृष्णा पारांगे व उपसभापती पदासाठी भाई शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर परिवर्तन विकास आघाडीकडून सभापती पदासाठी देवयानी अजित देशमुख आणि उपसभापती पदासाठी प्रमिला महेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.
मतदान प्रक्रियेत महायुतीला बहुमत मिळाल्याने सभापतीपदी कृष्णा पारांगे तर उपसभापतीपदी भाई शिंदे विजयी झाले. या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, माजी सभापती नरेश पाटील, भाजप नेते सुधीर ठोंबरे, प्रवीण मोरे, संदेश पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या निवडणुकीचा कारभार तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड व गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी पाहिला. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
खालापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे कृष्णा पारांगे तर उपसभापतीपदी शिंदे गटाच्या शिवसेनेचे भाई शिंदे यांची निवड झाली. या निवडीनंतर शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
अलीकडेच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत ८ जागांसाठी महायुती (भाजप व शिंदे गट शिवसेना) आणि परिवर्तन विकास आघाडी (ठाकरे गट शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादी) यांच्यात थेट लढत झाली होती.निकालात भाजपला ३, शिंदे गट शिवसेनेला २, ठाकरे गट शिवसेनेला २ तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली.





