पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

नवी दिल्ली – लष्कर-ए-तोयबाचा खतरनाक दहशतवादी रझाउल्ला निजामनी खालिद उर्फ अबू सैफुल्ला खालिद याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली. ती घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतात घडल्याची माहिती दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. भारतातील विविध दहशतवादी हल्ल्यांचा तो सूत्रधार होता.
खालिदवर ३ बंदुकधाऱ्यांनी हल्ला केला. गोळीबारात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रूग्णालयात पोहचण्याआधीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त सिंध प्रांतातील प्रसारमाध्यमांनी दिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयावर दहशतवाद्यांनी २००६ यावर्षी हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा दलांनी तत्परतेने कारवाई करत हल्ल्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना ठार केले. त्या हल्ल्याचा कट खालिदने रचला होता.
त्याशिवाय, भारतातील इतर काही ठिकाणी दहशतवादी कारवाया घडवण्यातही तो सामील होता. काही वर्षांपूर्वी तो तोयबाच्या नेपाळमधील गटाची सुत्रे सांभाळत होता. प्रामुख्याने भारत-नेपाळ सीमेवरील दहशतवाद्यांच्या सक्रियतेमागे तो होता. खालिदचा खात्मा भारताच्या दृष्टीने लक्षणीय घडामोड मानली जात आहे.





