Walmik Karad : कराड कुटुंबीयांकडून थकलेल्या फ्लॅटचा करभरणा; अॅानलाइन पद्धतीने जमा केली इतकी रक्कम

पुणेः बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच देशमुख हत्या प्रकरणात संशयाचा ठपका असलेले वाल्मीक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मकोका लावण्यात आला. यानंतर वाल्मीक कराड याच्या नावावर पिंपरी-चिंचवडमध्ये दोन आलिशान फ्लॅट असल्याचे समोर आले होते. यापैकी पिंपरी येथील पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीच्या सहाव्या मजल्यावर एक फ्लॅट तर वाकड येथे दुसरा फ्लॅट आहे. या दोन्ही फ्लॅटच्या थकीत करामुळे फ्लॅटच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मात्र, कराड याच्या कुटुंबीयांनी थकलेला कर अॅानलाइन पद्धतीने जमा केल्याची माहिती मिळत आहे.
पिंपरी येथील १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा थकलेला कर भरण्यात आला आहे. तर वाकड येथील फ्लॅटची २० हजार ६७१ पैकी ९ हजार ६८७ रुपयांचा पहिला हप्ता भरण्यात आला आहे. कराड कुटुंबीयांनी हे दोन्ही थकीत कर ऑनलाईन पद्धतीने अदा केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पार्क स्ट्रीट सोसायटीत जून २०२१ मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला. वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे असलेल्या अलिशान फ्लॅटचा आत्तापर्यंत एक रुपयांचा ही कर अदा करण्यात आला नव्हता. मात्र, आता दोन्ही फ्लॅटचे थकीत कर भरण्यात आले आहेत.
कोटीची रक्कम आली कुठून?
पार्क स्ट्रीट येथे २०२१ मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला होता. तर २०१६ मध्ये पिंकी सिटी रोडवरील मि कासा बिला सोसायटीत टू बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला होता. पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील 403 नंबरचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटवर वाल्मिक कराडचे नाव आहे. १ एप्रिल १०१६ पासून हा फ्लॅट कराडची पत्नी मंजली यांच्या नावावर असल्याची नोंद पिंपरी पालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. यामुळे आता प्रश्न हा निर्माण होतो की या मिळकती खरेदी करण्यासाठी कराडकडे एवढ्या कोटीची रक्कम आली कुठुन?





