टाटा पंचने गाठला 6 लाख युनिट्सचा टप्पा

Tata Punch – भारतातील अग्रगण्य वाहन निर्माता टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा पंचच्या ६ लाख युनिट्स विक्रीचा टप्पा पार केल्याची घोषणा केली. ऑक्टोबर २०२१ मध्ये लाँच झालेल्या पंचने अवघ्या चार वर्षांत हा विक्रम गाठून देशातील सर्वाधिक पसंतीस उतरणाऱ्या एसयूव्हींमध्ये आपले स्थान अधिक बळकट केले आहे.
पंचने सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागात आपल्या आकर्षक डिझाइन, ५-स्टार सुरक्षितता आणि विविध पॉवरट्रेन पर्यायांसह (पेट्रोल, सीएनजी, ईव्ही) ग्राहकांमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. आज पंच टाटा मोटर्सच्या एकूण प्रवासी वाहन विक्रीमध्ये ३६% योगदान देत असून, एकट्या महाराष्ट्रातूनच १२% विक्री झाली आहे.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवात्स यांनी सांगितले की, “पंच केवळ कार नसून आधुनिक भारतीयांचा आत्मविश्वास, साहस व स्वावलंबन यांचे प्रतीक आहे. हे यश ग्राहकांच्या विश्वासाची साक्ष आहे.”
पंचची लोकप्रियता पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांमध्ये ७०% असून, महिला ग्राहकांमध्येही तिची मागणी वाढली आहे. पंचच्या EV व्हेरिएंटच्या २५% मालक महिला आहेत. ही कार शहरातील तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये सारखीच लोकप्रिय आहे.
या यशाचा उत्सव साजरा करत टाटा मोटर्सने ‘इंडिया की एसयूव्ही’ ही राष्ट्रीय मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम केवळ एका कारचा प्रवास नव्हे, तर नव्या भारताच्या स्वप्नांचा, आत्मविश्वासाचा आणि उर्जेचा गौरव आहे, असे टाटा मोटर्सने सांगितले.



