ओला इलेक्ट्रिकचा महसूल वाढला; शेअरमध्ये 20 टक्क्यांची उसळी

नवी दिल्ली – ओला इलेक्ट्रिक कंपनीचा पहिल्या तिमाहितील महसूल मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरची सोमवारी जोरदार खरेदी केली. परिणामी मुख्य निर्देशांक कमी झाले असतानाही या कंपनीचा शेअर 20 टक्क्यांनी वाढवून 47 रुपये 13 पैसे प्रति शेअर या बातमीवर गेला होता.
या कंपनीने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, पहिल्या तिमाहित कंपनीचा महसूल 35.5% वाढून 828 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत या कंपनीचा महसूल 611 कोटी रुपये इतका होता.
या कंपनीने पहिल्या तिमाहीत 68,192 वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी या तिमाहीत ही संख्या 51,375 युनिट होती. म्हणजे वाहन विक्रीत या कालावधीत 32.7% वाढ झाली आहे. कंपनीने आपला खर्च कमी करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे कंपनीचा ताळेबंद आणखी सुधारण्याची शक्यता आहे. यामुळे कंपनीच्या शेअरची खरेदी होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची विक्री चालूच
सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घट
अमेरिकेच्या व्यापार धोरणाचा अमेरिकेच्या शेअर बाजाराबरोबरच जागतिक शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम चालूच आहे. अमेरिका अनेक देशाविरोधात आयात शुल्काची एकतर्फी घोषणा करीत आहे. भारत आणि अमेरिकेत दरम्यान यासंदर्भात चर्चा चालू आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार नफा काढून घेत असून सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घट झाली.
अमेरिकेच्या अस्थिर धोरणामुळे अमेरिकेला निर्यात कमी होईल. या दृष्टीकोनातून माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली असल्याचे दिसून येते. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 287 अंकांनी कमी होऊन 82,253 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 67 अंकांनी म्हणजे 0.27 टक्क्यांनी कमी होऊन 25,082 टक्क्यावर बंद झाला.
सेन्सेक्स 9 जुलैपासून कामकाजाच्या चार दिवसांमध्ये 1,460 अंकांनी म्हणजे 1.75 टक्क्यांनी तर निफ्टी 440 अंकांनी म्हणजे 1.53 टक्क्यांनी कमी झाला आहे. बजाज फायनान्स, इन्फोसिस, टाटा कन्सल्टंट सर्विसेस, टाटा मोटर्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात विक्री वाढविली असून शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 5,104 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची माहिती शेअर बाजारांनी जारी गेली.
मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मुख्य निर्देशांकात घट झाली असली तरी छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिड कॅप व स्मॉल कॅपमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिकेच्या व्यापार धोरणामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. रॅलीगेअर ब्रोकिंग कंपनीचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, जोपर्यंत अमेरिका भारतादरम्यानच्या व्यापार कराराची बोलणी संपुष्टात येत नाही तोपर्यंत निर्देशांक अस्थिर राहण्याची जास्त शक्यता आहे.
जागतिक बाजारातही नकारात्मक वातावरण होते. शुक्रवारी अमेरिकेचे शेअर बाजार निर्देशांक कमी झाले होते. सकाळी युरोपियन बाजारातून नकारात्मक संदेश आले. तसेच जपानच्या शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्यामुळे गुंतवणूकदार खरेदीचे धाडस करीत नाहीत. शेअर बाजारातील 2,137 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तर 2,054 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.





