Tata Punch: कार घेण्याचा विचार करताय? 13 जानेवारीला लाँच होणार ‘टाटा पंच’चं नवं माॅडेल; पाहा फिचर्स, किंमत

Tata Punch Facelift 2026 : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स आपली सर्वाधिक लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही ‘टाटा पंच’चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल १३ जानेवारी रोजी लाँच करण्याच्या तयारीत आहे. २०२१ मध्ये पहिल्यांदा लाँच झाल्यापासून या कारला मिळणारा हा पहिलाच मोठा अपडेट आहे. गेल्या काही महिन्यांत या कारच्या चाचणी दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यावरून या नव्या मॉडेलमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील हे स्पष्ट झाले आहे.
नव्या टाटा पंच फेसलिफ्टचे बाह्य डिझाइन प्रामुख्याने ‘पंच ईव्ही’वरून प्रेरित असेल. यात नवीन फ्रंट ग्रिल, लोअर एअर डॅम आणि अपडेटेड हेडलॅम्प्स पाहायला मिळतील. कारच्या समोरच्या भागात नवीन डीआरएल्स (DRLs) दिले जातील, मात्र कनेक्टेड लाइट्स मिळण्याची शक्यता कमी आहे. बाजूच्या प्रोफाइलमध्ये कारचा आकार पूर्वीसारखाच असला, तरी आकर्षक डिझाइनचे नवीन अलॉय व्हील्स आणि नवीन रंगांचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. कारच्या मागील भागात सुधारित बंपर आणि स्किड प्लेट्समुळे तिचे एसयूव्ही स्वरूप अधिक उठावदार दिसेल.
That Khalbali you hear?
It’s us, back to change the SUV game once again.#TataMotors #TataMotorsPassengerVehicles #TataPunch #NewPunch #CommandWithPunch pic.twitter.com/5mpuOZLmUv— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) January 3, 2026
इंटीरियर आणि अत्याधुनिक फीचर्स –
गाडीच्या अंतर्गत भागातही अनेक प्रीमियम बदल करण्यात आले आहेत. यात टाटाच्या नवीन गाड्यांप्रमाणे इल्युमिनेटेड लोगो असलेले टू-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि नवीन डॅशबोर्ड लेआउट असेल. मनोरंजनासाठी १०.२५ इंचाची मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम आणि टच-इनेबल्ड कंट्रोल बटणे दिली जातील. सुरक्षितता आणि सुविधेसाठी ३६०-डिग्री कॅमेरा आणि ऑटो-फोल्डिंग ओआरव्हीएम (ORVMs) यांसारखे फीचर्स जोडून टाटा या कारला आपल्या सेगमेंटमध्ये अधिक प्रबळ बनवणार आहे.
इंजिन आणि किंमत –
तंत्रज्ञानाचा विचार करता, इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल होणार नाही. यात पूर्वीप्रमाणेच १.२ लीटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल, जे ८८ hp पॉवर आणि ११५ Nm टॉर्क जनरेट करते. हे मॉडेल सीएनजी पर्यायातही उपलब्ध असेल आणि ५-स्पीड मॅन्युअल व ५-स्पीड एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय मिळेल. सध्या टाटा पंचची किंमत ५.५० लाख रुपयांपासून सुरू होते, मात्र फेसलिफ्ट मॉडेलची किंमत साधारण ६ लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. बाजारात या कारची थेट स्पर्धा ह्युंदाई एक्सटर आणि सिट्रोन सी-३ शी असेल.





