Tata Punch Flex: पेट्रोल, सीएनजी, इलेक्ट्रिक नंतर आता टाटा पंच इथेनॉल व्हेरिएंटमध्ये

Tata Punch Flex: टाटा मोटर्सने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये आपली कॉम्पॅक्ट SUV नवीन पंच फ्लेक्स फ्युएल संकल्पना सादर केली. पंच आता 100 टक्के इथेनॉलवर चालण्यास सक्षम असेल. सध्या पंचमध्ये पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिकवर चालण्याची सुविधा आहे. सध्या टाटा पंच ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. आता कार कंपन्या फ्लेक्स इंधनावर भर देत आहेत. इथेनॉलची आजकाल पर्यायी इंधनांमध्ये बरीच चर्चा होत आहे आणि जगातील अनेक देशांमध्ये लोक वापरत आहेत.

फ्लेक्स इंधन म्हणजे काय?
पेट्रोलला पर्याय म्हणून फ्लेक्स इंधनाचा वापर केला जाऊ शकतो. त्याचा वापर केल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होते. याशिवाय ऊर्जेचीही बचत होते. पेट्रोल व्यतिरिक्त इथेनॉलच्या मिश्रणावरही इंजिन चालू शकते. इथेनॉल हे जैव इंधन आहे, जे गहू, मका आणि उसापासून बनवले जाते, फ्लेक्स इंधनाचा वापर लवकरच भारतात दिसून येईल. सरकारही यावर वेगाने काम करत आहे. इथेनाॅल जैव इंधनालाच फ्लेक्स इंधन म्हणतात.

पंच 100% फ्लेक्स इंधनावर चालेल –
टाटा पंच येत्या काही दिवसांत फ्लेक्स फ्युएल अवतारात दिसू शकते आणि विशेष गोष्ट म्हणजे ती १००% इथेनॉलवर (फ्लेक्स इंधन) चालू शकते. परंतु सध्या फ्लेक्स इंधन भारतात फारसे चांगले नाही आणि ते पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी सारखे सहज उपलब्ध नाही. पण पारंपरिक इंधन आणि गॅसच्या तुलनेत फ्लेक्स इंधनाची किंमत कमी असेल, असे मानले जात आहे.
टाटा पंच फ्लेक्स इंधनाची वैशिष्ट्ये –
टाटा पंच फ्लेक्स फ्युएलमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. इथेनॉलच्या अधिक घातक परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी हे इंजिन देखील अद्ययावत करण्यात आले आहे. यामुळे पंच 100% फ्लेक्स इंधनावर चालेल. व्हेरियंटमध्ये उपलब्ध 86bhp ची पॉवर आणि 115Nm चा टॉर्क देखील तसाच राहण्याची अपेक्षा आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT पर्यायाने सुसज्ज असेल. सुरक्षेसाठी यात 2 एअरबॅग, एबीएस आणि ईबीडीची सुविधा असेल.





