IPL Title Sponsorship : चीनी कंपन्यांना बीसीसीआयचा पुन्हा ‘टाटा’…

मुंबई – राजकीय तणावामुळे काही वर्षांपूर्वी चीनच्या कंपन्यांचे प्रायोजकत्व नाकारत असलेल्या बीसीसीआयने यंदाही आयपीएल स्पर्धेच्या पुढील पाच वर्षांच्या हक्कांसाठी टाटा समुहाशीच असलेला करार वाढवला आहे. त्यामुळे तब्बल २ हजार ५०० कोटी रुपयांना हे हक्क टाटा समुहाकडे देण्यात आले आहेत.
एका आयपीएलच्या मोसमासाठी बीसीसीआयला मुख्य प्रायोजकाकडून ५०० कोटी रुपये मिळतील.याआधीही टाटा समुहाकडेच हे हक्क होते. कंपनीने २०२२ साली ७३० कोटी रुपये देऊन २०२३ पर्यंत हक्क खरेदी केले होते. बीसीसीआयकडून निविदा कागदपत्रे खरेदी केल्यानंतर कंपन्या बोली लावतात. यामध्ये आदित्य बिर्ला समूहाने २५०० कोटींची बोली लावली. त्यानंतर बीसीसीआयने गेल्या मोसातील प्रायोजक टाटा समुहाकडे इच्छूक असल्याची विचारणा केली होती.
टाटा समूहानेही २५०० कोटींची बोली लावली आणि प्रायोजकत्व मिळवले. बीसीसीआयने महिन्याभरापूर्वी आयपीएलचे टायटल राइट्स विकण्यासाठी टेंडर जारी केले होते. हक्क खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना बीसीसीआयकडून ५ लाख रुपयांचे टेंडर दस्तऐवज खरेदी करावे लागले. ज्याची शेवटची तारीख ८ जानेवारी होती. कागदपत्र खरेदी केल्यानंतर, कंपन्यांना बीसीसीआयकडे याबाबतचा तपशील पाठवावा लागला.
म्हणून चीनबाबत नकार
बीसीसीआयने आपल्या निविदा दस्तऐवजातच स्पष्ट केले होते की, चिनी कंपन्या प्रायोजकत्वासाठी बोली लावू शकत नाहीत. भारत आणि चीनमधील सीमा आणि राजकीय वादामुळे बीसीसीआयने चिनी कंपन्यांकडून प्रायोजकत्व न घेण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी २०२१ मध्ये चिनी कंपनी व्हीवो या स्पर्धेची मुख्य प्रायोजक होती.
IPL 2024 : आयपीएल स्पर्धा भारतातच होणार! बीसीसीआयने केले जाहीर, मात्र अद्याप…
सर्वात आधी डीएलएफकडे होते हक्क
२००८ साली डीएलएफ आयपीएल म्हणत होते. याला मुख्य प्रायोजकत्व म्हणतात. २००८ साली प्रायोजकत्वासाठी दरवर्षी ५० कोटी बीसीसीआयला देण्यात आले होते, तर २०२४ मध्ये हा करार ५०० कोटींवर पोहोचला आहे.
IPL 2024 : भारतात यावर्षी आयपीएल होणार नाही? समोर आलं ‘हे’ मोठं कारण…
मार्चपासून स्पर्धेची सुरुवात शक्य
आयपीएलचा यंदाचा मोसम २२ मार्चपासून सुरू होऊ शकते, मात्र देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर न झाल्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. गेल्या मोसमात ही स्पर्धा ३१ मार्च ते २८ मे या कालावधीत पार पडली होती. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले.





