पुणे – खडकवासला विधानसभेसाठी महायुतीकडून भीमराव धोंडिबा तापकीर, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) सचिन शिवाजीराव दोडके आणि मनसेतर्फे मयूरेश वांजळे यांच्यात तिरंगी लढत झाली. २०१९मध्ये विजय-पराजयाचे अंतर केवळ २५९५ इतके होते. यामुळे हे अंतर दोडके तोडतील, असे चित्र प्रचारादरम्यान दिसत होते. दुसरीकडे मयूर वांजळे यांच्या उमेदवारीने लढत तिरंगी होईल, असाही अंदाज वर्तवला जात होता. मात्र, हे सगळे अंदाज फोल ठरवत भीमराव तापकीर यांनी सचिन दोडके यांना धोबीपछाड देत विजय मिळवला. या मतदारसंघात महिलांच्या मतदानाची टक्केवारी ५७.२० टक्के होती. खडकवासला मतदारसंघाची २००९ मध्ये निर्मिती झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी मनसेकडून निवडणूक लढवून विजय साकारला. मात्र, २०११ मध्ये त्यांचे अकस्मिक निधन झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यावेळी भाजपने अगदी नवखे असलेले माजी नगरसेवक भीमराव तापकीर यांना उमेदवारी मिळाली, त्यांच्या विरोधात वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे होत्या. तापकीर यांनी अवघ्या ३,६२५ मतांनी विजय मिळवला. २०१४मध्ये भाजपने पुन्हा तापकीर यांना संधी दिली. नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फायदा आणि भाजपचा मजबूत आधार यामुळे तापकीर या मतदारसंघातून दुसाऱ्यांदा निवडून आले. २०१९ च्या निवडणुकीतही भाजपने पुन्हा तापकीर यांनाच संधी दिली. त्यावेळी त्यांचा १ लाख २० हजार ५१८ मतांनी निसटता विजय झाला, यामुळे २०२४ ची निवडणूक सचिन दोडके आणि भीमराव तापकीर यांच्यात चुरशीची होणारी अशी स्थिती होती. त्यातच मनसेकडून मयूरेश वांजळे यांना उमेदवारी मिळाल्याने तिरंगी लढतीचे चित्र होते. मयूरेश वांजळे किती मते घेतात यावर विजयी उमेदवाराचे मताधिक्य ठरणार होते. परंतु. वांजळे यांना मिळालेली मते लक्षात घेता ही लढत फक्त तापकीर आणि दोडके यांच्यातच झाल्याचे दिसते. मात्र, वांजळे यांनी घेतलेली मतेही दखल घेण्यासारखी होती. त्यांच्याकडे खडकवासल्यातील उभरते तरुण नेतृत्व म्हणून पाहता येऊ शकते. मतदानाचा टक्का वाढला खडकवासला विधानसभा मतदारसंघात २०१९मध्ये ४ लाख ८६ हजार ९४८ मतदार होते, त्यातील २ लाख ५० हजार ७१ (५१.३५ टक्के) जाणांनी मतदानाचा हक्क बजावला. २०२४ मध्ये ५,७६,५०५ मतदार संख्या होती. त्यातील ३,२५, ८४१ (५६.५२ %) मतदारांनी हक्क बजावला. त्यात महिलांची टक्केवारी जास्त आहे. पुरुष ५५.९१, तर महिला ५७.२० टक्के आहेत. खडकवासल्यात ५६.५२ % मतदान झाले. याचा अर्थ ५.१७ टक्के मतदान वाढले आहे. उमेदवार मते भीमराव तापकीर (महायुती) – १,६३,१३१ योगेश दोडके (महाआघाडी) – १,१०,८०९ मयुर वांजळे (मनसे) – ४२,८९७