100 पैकी 100 मार्क ! संभाजीनगरची ‘तनिशा बोरामणीकर’ राज्यात अव्वल; सांगितला फ्युचर प्लान….

Tanisha Sagar Boramanikar । HSC Exam2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता आला. यावर्षी राज्यात १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली, ज्याचा आज निकाल लागला आहे.
विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. तर, निकालात कोकण विभाग अव्वल ठरला असून, सर्वात कमी निकाल हा मुंबई बोर्डाचा लागला आहे.
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय.
या शाखांसाठी एकूण १४,३३,३७१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,२३,९७० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,२९,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी ९३.३७ आहे.
विशेष म्हणजे यंदा सर्वच शाखेचे निकाल जबरदस्त लागले आहेत. छत्रपती संभाजी नगरची विद्यार्थीनी राज्यात पहिली आली आहे. या विद्यार्थीनीला शंभर टक्क्यांपैकी शंभर टक्के पडले आहेत.
छत्रपती संभाजी नगरची विद्यार्थीनी राज्यात पहिली
‘तनीषा सागर बोरामणीकर’ असे या विद्यार्थीनीचे नाव असून ती छत्रपची संभाजी नगरच्या देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. तनीषा सागर बोरामणीकर ही राज्यातून पहिली आली असून, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तनिषाला बारावीतील ५१८ गुणांसह १८ क्रीडा गुण मिळाले आहेत. त्यामुळे ही विद्यार्थिनी १०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. तनिषा ही राष्ट्रीय स्तरावर खेळलेली बुद्धीबळपटू आहे.
ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, पाली व अर्थशास्त्र विषयात तनिषाला शंभर पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर इंग्रजी विषयात ८९, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी विषयात ९५ तर सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयात ९८ गुण मिळाले आहेत.
तनिषा बुध्दीबळ खेळाडू असून तिने आठ वर्षाखालील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच ओपन नॅशनल्स आणि राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने सहभाग घेतला होता. बुद्धीबळाचा पट गाजवणाऱ्या तनिषाने बारावीच्या परीक्षेतही चमकदार कामगिरी केलीय.
तनीषा बोरामणीकर काय म्हणाली पाहा….
माध्यमांशी बोलताना तनिषा म्हणाली, “मला खूप छान वाटत आहे, मी फक्त ९५ टक्के अपेक्षित धरले होते. मात्र मला १०० टक्के मार्क मिळाले आहेत. राज्यात प्रथम आले हे माझ्यासाठी खूप छान आहे. यामध्ये माझे आई वडील कुटुंब आणि शिक्षक यांचे श्रेय आहे. त्यांनीही माझ्यासाठी खूप मेहतन घेतल्याचे तनीषा सागर बोरामणीकर हिने म्हटले.
मला भविष्यात यूपीएससी क्रॅक करायची आहे. मी आता लगेच सीएची परीक्षा देणार आहे. यंदा छत्रपती संभाजी नगर विभागाचा निकाल चांगलाच लागलाय. मुलांपेक्षा मुलींनी तब्बल ३.२७ टक्के अधिक मिळवले आहेत.
संपूर्ण राज्यात कॉपीमुक्त परीक्षा पार पडली. भरारी पथकांच्या संख्येतही मोठी वाढ करण्यात आली होती. आता दहावीच्या निकालाची वाट विद्यार्थ्यांकडून बघितले जातंय’. असं ती यावेळी म्हणाली.
दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा
दरम्यान, आज (दि. २१) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जातंय. मे महिन्याच्या चाैथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.





