तामिळनाडूचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांच्या कोठडीत पुन्हा वाढ; भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केली होती अटक

चेन्नई – मनी लॉंडरिंग प्रकरणात अटकेत असलेले तामिळनाडूचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सेंथिल बालाजी यांची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयीन कोठडीत 26 जुलैपर्यंत वाढ केली.
सेंथिल बालाजी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 14 जून रोजी भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात अटक केली होती. बालाजी यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर 15 जून रोजी मद्रास उच्च न्यायालयाने सेंथिल बालाजीला खासगी रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले आहेत. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता.





