तामिळनाडूतील लॅपटॉप चोर टोळीचा म्होरक्या जेरबंद; कारच्या काचा फोडून पळवायचा लॅपटॉप

संजय कडू
पुणे – शहरातील पार्किंग आणि रस्त्याच्याकडेला पार्क केलेल्या आलिशान कारच्या काचा फोडून लॅपटॉप चोरणारी तामिळनाडूतील टोळी कार्यरत होती. या टोळीच्या म्होरक्याला स्वागरेट पोलिसांनी बंगलोर येथून अटक केली आहे. त्याच्याकडून शहरातील तब्बल ११ लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. तो मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांने राज्यात इतरही ठिकाणी असे गुन्हे केल्याचे समोर येत आहेत. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरु आहे.
सुरेशकुमार पांडुरंगन सेरवई (५०,रा. श्रिरंगम, जि.त्रिचापल्ली, तामिळनाडू) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार सेंथील कुमार महालिंगन याच्यासह आणखी एकाचा शोध सुरु आहे. सुरेशकुमारच्या ताब्यातून दिड लाख रुपये किंमतीचे दोन लॅपटॉप हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.
वरीष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे यांनी सांगितले की, स्वागरेट पोलीस ठाण्यामध्ये फॉरर्च्युनर गाडीची काच फोडून एक लाख रुपये किंमतीचा लॅपटॉप आणि एअरपॉडची बॅग चोरुन नेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे व उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे तसेच पोलीस अंमलदार प्रतिक लाहिगुडे, दिनेश भांदुर्गे आणि संदीप घुले यांच्या मदतीने तांत्रिक शोध घेतला असता, आरोपी हा बंगलोर येथे असल्याची खबर मिळाली. त्यानूसार बंगलोर पोलिसांशी संपर्क साधून आरोपीला ताब्यात घेतले.
…असे सापडले लोकेशन
सुरेशकुमार याने लॅपटॉप चोरल्यावर मुंबईतील सायन गाठले. तेथे त्याने लॅपटॉप चालू केल्यावर तांत्रिक विश्लेषणात लोकेशन सापडले. पोलिसांनी सायन गाठल्यावर त्यांना तो कर्नाटकातील दावणगिरी येथे जात असल्याचे समजले. त्यांनी सायनवरुन कर्नाटकात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हलची माहिती काढली. तीन ट्रॅव्हल बस कर्नाटकात चालल्या होत्या. त्यातील एका बस चालकाचे लोकेशन आणि लॅपटॉपचे लोकेशन एकच आढळले. यानंतर बस चालकाला फोन करुन बसमध्ये कोणी लॅपटॉप चालू ठेवला आहे का? याची खात्री करण्यात आली.
त्याने हो म्हणताच त्याला पुढील टोल नाक्यावर पोलिसांशी संपर्क साधून आरोपीला ताब्यात देण्यास सांगितले. यानंतर पुणे पोलिसांचे पथक तेथे पोहचून त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी गाडीमध्ये मोबाईल किंवा आयपॅड असले तरी ते चोरत नव्हता. कारणकी लोकेशन सापडेल अशी त्याला भिती होती. मात्र लॅपटॉपवरील नेटमुळे आयपी ॲड्रेस ट्रेस करुन त्याचे लोकेशन पोलिसांना मिळवता आहे. ही टोळी पुणे शहरात बस किंवा रेल्वेने येऊन एकाच दिवसांत जीतक्या गाड्या फोडत येतील तीतक्या फोडून लॅपटॉप घेऊन पळ काढत होती.
…हेअर पीन आणि गोटीने फोडायचे काच
गाडीची काच फोडण्यासाठी हेअर पीनला रबर बँड लावून कागदात गोटी गुंडाळून लगोर तयार केली जात होती. यानंतर गाडीची काच फोडली जायची. एक आरोपी रेकी करायचा, दुसरा काच फोडायचा आणि तिसरा लॅपटॉप घेऊन पळ काढायचा असे त्यांची कार्यपध्दती होती.





