Tamil Nadu Rain : तमिळनाडूला पावसाचा जोरदार तडाखा; भिंत कोसळून तरुणी ठार !
दिंडिगुल, इरोड, पेरांबलूर, अरियालूर, तिरुवरूर आणि थेनीसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. मदुराई आणि विरुधुनगरमध्येही पावसामुळे तापमानात घट झाली आहे.

Tamil Nadu Rain : तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून, काही जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूरजवळ भाड्याच्या घराची भिंत कोसळून १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर तिची आई जखमी झाली.
मृत विद्यार्थिनीची ओळख मुथुचेल्वी अशी पटली आहे. गुरुवारी रात्री कुटुंब झोपलेले असताना ही दुर्घटना घडली. परिसरात पाच तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस झाला होता. जखमी आई सोलाईअम्मल यांना सत्तूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिंडिगुल, इरोड, पेरांबलूर, अरियालूर, तिरुवरूर आणि थेनीसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. मदुराई आणि विरुधुनगरमध्येही पावसामुळे तापमानात घट झाली आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, २६ ऑक्टोबरपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याचा अंदाज आहे.
सध्याच्या हवामान प्रणालीचा तमिळनाडूला थेट धोका नसला, तरी राज्यातील उत्तरेकडील जिल्ह्यांत २६ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहू शकतो. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील ८९ जलाशयांमध्ये २२ ऑक्टोबरपर्यंत एकूण क्षमतेच्या २७.९ टक्के पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १३४.४ टीएमसीने कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.





