बँकॉक – थायलंड आणि कंबोडियादरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष समाप्त करण्यासाठी दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये मलेशियामध्ये चर्चा होणार आहे. थायलंडच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे. संघर्ष समाप्त करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांवर आणलेल्या दबावामुळे ही चर्चा होते आहे. गेल्या ४ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत ३४ जण ठार झाले आहेत. तर दिड लाखांपेक्षा जास्त लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. आसियानचे अध्यक्षपद असलेल्या मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी प्रादेशिक शांततेसाठी दोन्ही देशांच्या नेत्यांना सोमवारी चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. त्यानुसार थायलंडचे प्रभारी पंतप्रधान फुमथाम वेचायाचाय हे चर्चेसाठी जाणार आहेत. तर कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट हे देखील चर्त सहभागी होणार आहेत, असेही थायलंडच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. मात्र कंबोडियाच्याबाजूने या वृत्ताला दुजोरा दिला गेलेला नाही. थायलंड आणि कंबोडियाच्या नेत्यांशी आपण फोनवरून चर्चा केली असून जर हा संघर्ष असाच सुरू राहिला तर दोन्हीपैकी कोणत्याही देशाशी व्यापारी करार केला जाणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दोन्ही देशांनी युद्धबंदी करार करण्यासाठीची चर्चा करायची तयारी दाखवली असल्याचेही ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीसाठी चर्चा करायला कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेत यांनी तयारी दाखवली आहे. थायलंडनेही हल्ले थांबवण्याचे मान्य केले असल्याचे ट्रम्प यांनी आपल्याला सांगितल्याचे मानेत म्हणाले. युद्धबंदीच्या प्रयत्नांचा पाठपुरावा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी परराष्ट्र उपमंत्री प्राक सोखोन यांच्यावर सोपवल्याचे त्यांनी सांगितले. थायलंडचे पंतप्रधान फुमथाम वेचायाचाय यांनी मात्र सावध पवित्रा घेतला असून युद्धबंदीला थायलंडची तत्वतः मान्यता असल्याचे म्हटले आहे. मात्र युद्धबंदीसाठी कंबोडियाची प्रामाणिक इच्छा हवी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.