Rajgurunagar : तहसील कार्यालय परिसरात दारू पार्टीची चर्चा
Rajgurunagar : तहसीलदार कार्यालय आणि मोजणी अधीक्षक कार्यालय एकमेकांशेजारी असून, त्यापुढे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आहे. परिसरात अनेक वकिलांची कार्यालयेही आहेत.

राजगुरुनगर : गणेशोत्सवाच्या उत्साहात शहरात भक्तिमय वातावरण असताना राजगुरुनगर शहरातील तहसीलदार कार्यालय, मोजणी अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या परिसरातील उघड्या कचर्यात दारूच्या रिकाम्या बाटल्या मोठ्या संख्येने आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ऐन गणेशोत्सवात या परिसरात दारूची मैफल रंगली असावी, अशी चर्चा सुरू असून, बाटल्या येथे कोणी आणून टाकल्या, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
तहसीलदार कार्यालय आणि मोजणी अधीक्षक कार्यालय एकमेकांशेजारी असून, त्यापुढे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आहे. परिसरात अनेक वकिलांची कार्यालयेही आहेत. मात्र, या महत्त्वाच्या शासकीय कार्यालये व न्यायालयाच्या परिसरातील कचरा तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस, मोजणी अधीक्षक कार्यालयाजवळ तसेच न्यायालयासमोरील रस्त्यालगत उघड्यावर टाकला जात असल्याचे दिसून येत आहे.
रविवार (दि. 12) ते मंगळवार (दि. 15) या कालावधीनंतर या परिसरातील कचर्यात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. त्यामध्ये बिअरच्या बाटल्यांची संख्या अधिक आहे. तहसीलदार कार्यालय, मोजणी कार्यालय, न्यायालय तसेच वकिलांच्या कार्यालयात येणार्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्याचे छायाचित्रण करण्यात आले. या बाटल्यांचे छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर शहरात या प्रकाराची चर्चा सुरू झाली. गणेशोत्सवाच्या काळात शासकीय कार्यालये आणि न्यायालयाच्या परिसरात अशा प्रकारे दारूच्या बाटल्या आढळल्याने परिसराची स्वच्छता तसेच सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने कचर्यात बाटल्या कोणी आणून टाकल्या, याचा शोध घेण्यासाठी फुटेज तपासण्याची मागणी होत आहे. त्यामुळे या बाटल्या नेमक्या कोणी टाकल्या, याचा उलगडा तपासानंतरच होणार असून, प्रशासन याबाबत काय कारवाई करते, याकडे राजगुरुनगरकरांचे लक्ष लागले आहे.





