Pune District : वातावरणातील बदलाने किडींचा प्रादुर्भाव
Pune District : अनेक शेतकऱ्यांनी जनावरांच्या हिरव्या चाऱ्यांसाठी लागवड केलेल्या मका पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

वाल्हे : यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडला असून अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असतानाच वातावरणातील बदलाने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरीवर्गाला औषध फवारणीचा खर्च वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी जनावरांच्या हिरव्या चाऱ्यांसाठी लागवड केलेल्या मका पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आगोदरच अल्प पावसाने मेटाकुटीस आलेला शेतकरीवर्ग मका पिकांवरील किडीने चिंताग्रस्त होत आहे.
यावर्षी पुरंदर तालुक्यातील अनेक भागांत अल्प पावसाने जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट होत आहे. गोठ्यातील जनावरांना पुरेसा हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने जनावरे जागविण्यासाठी शेतकरीवर्ग धडपडत आहेत. अशातच जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतात केलेली मका अल्प पाण्यावर कशीतरी जगविण्यासाठी शेतकरीवर्ग धडपडत असताना या पिकांवर होत असलेले विविध रोगांमुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम शेतीवर आणि पर्यायाने पिकांवर होत आहे.
वाल्हे परिसरातील शेतकरी शेतीसह दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. जनावरांना ओला चारा म्हणून मका, कडवळ आदी चारा पिके करतात. मागील काही दिवसांपासून मका पिकांवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाल्याने मका पिक वाचवण्यासाठी अनेक शेतकरीवर्ग त्यासाठी औषध फवारणी करताना दिसत आहेत.
जनावर दगावण्यांची चिंता
लष्करी आळी मका पिकांला झाल्यावर मका पिकांची पाने आळी खाऊन मका पिकांच्या कोब्यामध्ये आळी राहिल्याने व ती मका चाऱ्यामधून जनावरांच्या पोटात गेल्यावर जनावरांचे पोट फुगून जनावरे दगवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकरी मका पिकांवर लष्करी आळीचा नाश करण्यासाठी औषध फवारणी करताना दिसत आहेत.
शेतकरी आस्मानी संकटात
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या पिकांना बाजारभाव नाही. त्यात नैसर्गिक आपत्ती ही पाचवीलाच पुजली आहे. शेतकऱ्यांच्या जोडधंद्याला ग्रहण लागला आहे. सध्या पशूधन धोक्यात आले आहे. दुधाचे बाजार अपेक्षित मिळत नसल्याने आगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मका पिक वाचवण्यासाठी औषध फवारणीसाठी अधिक आर्थिक संकटाच्या खोलामध्ये गेला आहे.





