Pune District : सोनोरी-सासवड रस्ता निकृष्ट
Pune District : यासंदर्भात आरपीआयचे अध्यक्ष सोनवणे यांनी पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. सासवड-सोनोरी रस्ता मागील तीन ते चार वर्षांपूर्वी करण्यात आला होता.

गराडे : पुरंदर तालुक्यातील सोनोरी-सासवड रस्त्याची दुरावस्था झाली असून त्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम नुकतेच करण्यात आले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप असून रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी आरपीआयचे पुरंदर तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी केली आहे.
यासंदर्भात आरपीआयचे अध्यक्ष सोनवणे यांनी पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. सासवड-सोनोरी रस्ता मागील तीन ते चार वर्षांपूर्वी करण्यात आला होता. परंतु त्याचे काम हे निकृष्ट झाल्याने एक वर्षाच्या आतच खराब झाले. त्यामुळे अनेक वर्षांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या मार्गावरून एसटी बस, शेतकरी आणि विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते.
परंतु या रस्त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांत मोठी नाराजी आहे. त्यातच पंचायत समितीकडून सभापतीच्या मंजुरीने रस्ता दुरुस्तीसाठी २० लाख रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. मात्र इतकी मोठी रक्कम खर्च करूनही प्रत्यक्ष कामाचा दर्जा निकृष्ट असून रस्त्यावरील खड्डे आजही कायम आहेत. झालेले काम हे तकलादू असून कामाची तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित बिल अदा करू नये, असे निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी लक्ष्मण पवार, आनंद काळे, सुनील शिंदे, शंकर काळे, विलास काळे, किसन काळे, भाऊसाहेब सोनवणे, संतोष सोनवणे उपस्थित होते.
पुरंदर पंचायत समितीचे सभापती यांच्या मंजुरीने हे काम वीस लाख रुपये किमतीचे असून त्यावेळी कांही ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्या विचाराने अंदाजपत्रक तयार केले होते. त्याप्रमाणे हे काम केले आहे. फिनिसिंग नसल्याने रोड खराब आहे. अजून ते काम पूर्ण झालेले नाही. आठ ते दहा दिवसांत पूर्ण करण्यास कॉन्ट्रॅक्टरला सांगितले असून काम तांत्रिकदृष्ट्या योग्य करण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
– संतोष नलावडे, शाखा अभियंता, पंचायत समिती पुरंदर.





