Pune District : होयसळ काळातील गणपती साकारला
Pune District : होयसळ शिल्पकलेमध्ये गणपतीला अनेकदा नृत्य मुद्रेत दाखवले आहेत. ही मूर्ती आपणास छञपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई येथे पाहायला मिळते.

वाल्हे : वाल्हे (ता. पुरंदर) नजीक माळवाडी येथील तरुण अतुल भुजबळ यांनी होयसळ काळातील म्हणजेच बाराव्या शतकातील पुरातन गणपतीची हुबेहूब आणि पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारली आहे. जवळपास आठशे वर्षांपूर्वीच्या पुरातन होयसळ स्थापत्यकलेत कोरलेल्या गणपतीच्या मूर्ती त्यांच्या अद्वितीय व नक्षीदार रेखीव कामांचे बारकाईने निरीक्षण करून हुबेहूब गणेश मूर्ती साकारली आहे.
अतुल भुजबळ (वय २८) हे पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑप्टोमेट्रिस्ट म्हणून कार्यरत असून वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत असतानाही त्यांनी सात वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.
कर्नाटकावर राज्य करणाऱ्या होयसळ राजांच्या काळात या मूर्ती आणि मंदिरांची निर्मिती मऊ साबण दगडापासून करण्यात आली असून ही दुर्मिळ, पुरातन मूर्तीचा नमुना मानला जातो. होयसळ शिल्पकलेमध्ये गणपतीला अनेकदा नृत्य मुद्रेत दाखवले आहेत. ही मूर्ती आपणास छञपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई येथे पाहायला मिळते.
मूर्तीच्या वैशिष्ट्यांवर संशोधन करून अतुल यांनी तिची प्रतिकृती अतिशय बारकाईने साकारली आहे. त्यात कोणतेही रासायनिक रंग,प्लास्टिक किंवा पीओपीचा वापर न करता पूर्णतः पर्यावरणपूरक शाडू मातीचा वापर तसेच सेंद्रिय साहित्याचा उपयोग केला आहे.
भुजबळ म्हणाले, साकारलेली प्रतिकृती कोणत्याही देखाव्याचा भाग नाही. घरीच मूर्तीची प्रतिष्ठापना करून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत आहे. गणेशोत्सव हा श्रद्धेचा भाग असला तरी त्यामध्ये निसर्गाची हानी होणार नाही याची जबाबदारी आपली आहे. म्हणूनच मी मूर्ती बनवताना पर्यावरणपूरक साहित्यच वापरतो. या प्रतिकृतीमुळे पुरातन मूर्तीकलेचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचतो. पर्यावरण रक्षणाचाही संदेश दिला जातो, असे त्यांनी सांगितते.





