पिंपरी | अस्वच्छतेमुळे हैराण तळेगावकर

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर)- तळेगाव शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच परिसरातील उद्योगधंदे देखील वेगाने प्रगती करत आहेत. शहराची लोकसंख्या आणि उद्योगधंदे ज्याप्रमाणे वाढत आहे, त्यामानाने पायाभूत सुविधांचा विकास होताना दिसत नाही.
नागरिकांकडून पाणीपुरवठा, स्वच्छता याबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. तर दुसरीकडे रस्ते, पाणीपुरवठा याबाबत उद्योजकांकडून नाराजीचा सुरू आहे.
यापार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहर भाजपाने आवाज उठविला असून शहरातील अस्वच्छता, पाणीपुरवठा आणि रस्त्यांचे प्रश्न याबाबत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष संतोष दाभाडे, रजनीताई ठाकूर, विनायक भेगडे, सुनिता पाटील, निर्मल ओसवाल, शोभा भेगडे, तनुजा दाभाडे, मृदुला भावे, पौर्णिमा उपाध्याय,
विनोद उपाध्याय, रोहन जाधव, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा शोभा परदेशी, वंदना दाभाडे, मीना भेगडे, साधना भेगडे, संजोगता आगळे, विद्या भेगडे, जयश्री टकले, अनिता भेगडे उपस्थित होते.
पाण्याची समस्या कधी मिटणार?
पाणी म्हणजे जीवन. परंतु तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या काही मार्गी लागताना दिसत नाही. शहरात सर्वच विभागात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याचा सर्वाधिक त्रास महिला भगिनींना होतो.
पाण्याचे अनियमित नियोजन, ठरलेल्या वेळेत पाणी न येणे, पाण्याला प्रेशर नसणे, कमी वेळ पाणी येणे असे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे, ‘शहरात पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, पाण्याअभावी जनजीवन विस्कळीत होत आहे.
त्यामुळे हा प्रश्न लवकर मार्गी लावावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेवर ‘कोरडा हंडा मोर्चा’ काढण्यात येईल.’ असा इशारा भाजपाने दिला आहे.
आठवडे बाजारात सुविधांचा अभाव
तळेगाव दाभाडे शहरात दर रविवारी आठवडे बाजार असतो. पंचक्रोशीतील नागरिक येथे फळभाजी सह दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी येतात. परंतु आठवडी बाजारात सोयीसुविधांचा अभाव आहे. बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांमध्ये महिलांची संख्या अधिक असते.
त्यामुळे जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक येथे महिलांकरिता स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. तसेच, शहरातील खांडगे पेट्रोल पंप जवळ, मेथडीज स्कूल जवळ, तळेगाव स्टेशन चौक, लिंब फाटा इथेही सुलभ शौचालय उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आधुनिक बस थांब्यांची आवश्यकता
तळेगाव शहरात मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, तळेगाव स्टेशन चौक ही महत्वाची बस स्थानके आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला, शाळकरी मुले-मुली, जेष्ठ नागरिक बसची वाट पाहत थांबतात. परंतु येथील थांब्यांची दुरवस्था झाली आहेत.
तर अनेक ठिकाणी बस थांबे नाहीत. त्यामुळे बसची वाट पाहणाऱ्या नागरिकांचे ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण होईल असे सोयीसुविधा युक्त बस स्थानके होणे आवश्यक आहे. तसेच शहरातील बसथांबे असणाऱ्या ठिकाणी चांगले शेड होणे गरजेचे असल्याची मागणी भाजपाने केली आहे.
यासह, शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहे. त्यांची देखील दुरवस्था झाली आहे. तळेगाव शहरातील ऐतिहासिक तळ्यांची स्वच्छता होणे गरजेचे आहे. त्याठिकाणी जात असलेले सांडपाणी रोखून तळ्यांची निगा राखली पाहिजे.
शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे आवश्यक आहे. अनेक भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे सामान्य तळेगावकरांचे बळी जाऊ शकतात. आजवर अनेक लहान मोठे अपघात झाले असून तातडीने रस्ते दुरुस्ती करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
अस्वच्छतेमुळे हैराण तळेगावकर
तळेगाव शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातही लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साठलेले पाणी, कचरा, अस्वच्छता यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढली आहे.
त्यामुळे, सांडपाणी साठलेल्या ठिकाणी, कचरा साचलेल्या ठिकाणी नगरपरिषेच्या संबंधित विभागाने लक्ष देऊन तिथे स्वच्छता करुन घ्यावी, तसेच कचऱ्याबाबत योग्य नियोजन करावे.
नियमित औषध फवारणी व्हावी, अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता वेळेवर न झाल्यास ‘कचरा स्वच्छता आंदोलन’ करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.





