Bihar Election 2025 | Workers – विधानसभा निवडणुकीसाठी बिहारमधील हमाली कामगार घरी परतत असल्याने, अनेक गावांमध्ये कामगारांचा तुटवडा जाणवू लागला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे खरेदी लांबणीवर पडल्याने अवकाळी पावसामुळे कापणी केलेला मका खराब होऊ शकतो, अशी भीती तेलंगणच्या जगतियाल जिल्ह्यातील चिंताग्रस्त शेतकऱ्यांना आहे. केवळ तेलंगणचेच नव्हे तर संपूर्ण भारतात ही समस्या जास्त जाणवत आहे. मल्लापूर भागात शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे की, फक्त एक खरेदी केंद्र २३ गावांना सेवा पुरवत असते. त्यामुळे अनेकांना त्यांचा मका सरकारच्या प्रति क्विंटल २,४०० रुपयांच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत विकावा लागत आहे. पुढील नुकसान टाळण्यासाठी अनेकांना १,८०० रुपयांपर्यंत समाधान मानावे लागले. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे, कापणीची यंत्रसामग्री थांबली आहे आणि पिके वाया गेली आहेत. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात ४३७ भात आणि १५ मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत आणि ८ नोव्हेंबरपर्यंत खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यायी कामगारांची व्यवस्था केली जात आहे. मात्र दोन टप्प्यांमध्ये बिहारमध्ये मतदान असल्याने बहुतांश बिहारी तिकडे गेल्याने कामगारांचा तुटवडा हीच एक गंभीर समस्या बनली आहे.