Talegaon Dhamdhere : वेळनदीला महापूर; तळेगाव ढमढेरे गावाला पुराचा विळखा
Talegaon Dhamdhere : केटी बंधाऱ्यांचे भराव वाहून, सर्व पूल पाण्याखाली

तळेगाव ढमढेरे : सततच्या मुसळधार पावसामुळे वेळनदीने बुधवारी सकाळपासून भीषण रौद्ररूप धारण केले. काही तासांतच नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने तळेगाव ढमढेरे गावाला पुराचा विळखा पडला.
गावठाणातील सखल भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून संपूर्ण परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूराचे पाणी बाजार मैदान, बसस्थानक परिसर, नदीकाठची शेती तसेच अनेक वस्तीपर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पूरामुळे NH-548D वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून तळेगाव ढमढेरेला जोडणारे वेळनदीवरील सर्व पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे गावाचा बाहेरील संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, वेळनदीवरील केटी बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत उचलले गेले नसल्याने पाण्याचा फुगवटा वाढून पूरस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वाढत्या पाण्याच्या दाबामुळे अनेक केटी बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूंचे भराव वाहून गेले असून काही ठिकाणी बंधाऱ्यांचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट असून या प्रकाराची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना पाण्याखाली गेलेले रस्ते व पूल ओलांडू नयेत, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सुरक्षित ठिकाणी राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, नदीच्या पाण्याची पातळी आणि परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
हेही वाचा:
Pune News : सिंहगड खोऱ्यात मुसळधार पाऊस ; वरदाडेचा पर्यायी पूल वाहून गेला, 60 गावांचा संपर्क तुटला





